गेल्या महिन्याभरापासून पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला लागू असणाऱ्या भाड्यावर टॅक्सी चालवताना टॅक्सीचालकांचे नुकसान होत आहे. या साऱ्या महागाईचा परिणाम म्हणजे इंटरनेट बेस्ड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टॅक्सी सेवा देणाऱ्या UBER ने आपल्या टॅक्सी भाड्यामध्ये १५ टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली आहे.
महागाईच्या काळात उबेर आणि ओला या टॅक्सी कंपन्यांनी या आधीच अनेक ठिकाणी भाडे वाढवलेआहे. पेट्रोल आणि डिझेल तसंच सीएनजीच्या किमतीत नुकत्याच झालेल्या प्रचंड वाढीमुळे उबेर आणि ओलाच्या चालकांनी भाडेवाढीची मागणी केली होती. उबेरने अनेक शहरांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत भाडे वाढवलेआहे तर ओलानेही भाडे ११ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.
यापूर्वी, उबेरने मुंबईत १५ टक्के तर कोलकात्यात १२ टक्क्यांनी भाडे वाढवलेहोते. अलीकडच्या काही दिवसांत इंधनाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून वाहनचालकांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ओला आणि उबेरने गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा भाडे वाढवले आहे. याआधी गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये दोन्ही कंपन्यांनी भाडे १५ टक्क्यांनी वाढवले होते.
तब्बल साडेचार महिन्यांच्या कालावधीनंतर २२ मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या दरम्यान १४ हप्त्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी १० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या तीन महिन्यांत सीएनजीच्या दरात किलोमागे १५ रुपयांनी वाढ झाली आहे.