कुख्यात गुंड रवी पुजारीला मुंबई पोलिसांनी मंगळवारी कर्नाटक येथून मुंबईला आणले. सत्र न्यायालयाने त्याला ९ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. २०१६ साली गजाली हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाची चौकशी यादरम्यान करण्यात येणार आहे. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलीस रवी पुजारीला घेऊन आल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर सत्र न्यायालयात नेत असताना पहिल्यांदाच रवी पुजारीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला.
मुळचा कर्नाटकाच्या उडुपी येथील रहिवासी असलेला पुजारी हा परदेशातून खंडणीचे रॅकेट चालवत होता. व्यावसायिक आणि सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना खंडणीसाठी पुजारीने धमक्या दिल्या होत्या. त्याच्याविरोधात महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक राज्यात खून, खूनाचा प्रयत्न आणि खंडणीचे आरोप दाखल झालेले आहेत. आजवर २५० हून अधिकचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल झाले आहेत.
पुजारीला मागच्या वर्षी आफ्रिकेच्या पश्चिम भागात असलेल्या सेनेगल येथून अटक करण्यात आली होती. सेनेगलमध्ये अँथोनी फर्नांडीस या नावाने पुजारीने आपले बस्तान बांधले होते. सेनेगल शिवाय त्याने मलेशिया, मोरोक्को, थायलंड, पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रिपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट या देशांमध्ये वास्तव्य केले होते. मात्र सेनेगल येथे बऱ्याच वर्षांनी परतल्यानंतर गुप्तचर यंत्रणांनी त्याला सापळा रचून अटक केली.