मुस्लिम महिलांची बदनामी करणाऱ्या ‘बुल्ली बाई’ ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांनी बंगळुरूतून २१ वर्षीय तरुणाला अटक केली होती. या प्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. या प्रकरणातील मास्टरमाईंड हा तरूण नसून मुख्य आरोपी उत्तरखंडात राहणारी महिला आहे. या महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी एकमेकांना ओळखत होते. या दोघांची एकमेकांशी सोशल मीडियातून ओळख झाली होती.
‘बुल्ली बाई’ प्रकरणात २१ वर्षीय तरुण विशाल कुमारला बंगळुरू येथून अटक केल्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. त्याला वांद्रे कोर्टात हजर केले होते. १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी महिला ‘बुल्ली बाई’ ॲपद्वारे तीन खाते हाताळत होती. तर तिचा साथीदार विशाल कुमार हा खालसा सुप्रीमिस्ट नावाने खाते वापरत होता. जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल की यामागे कोणी शीख समुदायाचा हात आहे. पण ॲपचा शीख समुदायाशी कोणताही संबंध नाही. पण आरोपीने समाजात तेढं निर्माण करण्याच्या हेतूने जाणूनबुजून असे भासवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या दोघांचे डाव मुंबई पोलिसांनी उधळून लावले. दिल्ली पोलिसचे स्पेशल सायबर युनिट ही केस हातळणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
काय होते प्रकरण
१ जानेवारीला रोजी जेव्हा अनेक मुस्लिम महिलांनी त्यांचा फोटो बुल्ली ॲपवर अपलोड झालेला पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. ‘गिटहब’ (GitHub) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होस्ट करण्यात आलेल्या ॲपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो वापरले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होते. ज्या महिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होत्या अशा १०० मुस्लिम महिलांना लक्ष्य केले होते. यामध्ये पत्रकार, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील महिलांचा समावेश होता.