एटीएमचा वापर सध्या सर्रास वाढला आहे. रोख रक्कमेची गरज लागली कि आपण सारेच जण बहुतांशी वेळी बँकेत न जाता सरळ एटीएम मध्ये जाऊन पैसे काढतो. एटीएम कार्डला चार आकडी पासवर्ड ठेवताना सहज सोपे क्रमांक टाळण्याचं आवाहन सायबर पोलिसांकडून वारंवार केलं जातं. असाच एक सोपा पिन म्हणजे टाकण्याची पद्धत म्हणजे पिन म्हणून आपली जन्मतारिख टाकणे.
मात्र अशाच प्रकारे स्वत:ची बर्थ डेट टाकून डेबिट कार्ड पिन बनवणे मुंबईतील एका रेल्वे कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. कारण अलिकडेच या तक्रारदाराची बॅग मुंबई लोकल ट्रेनमधून दादर भागात चोरीला गेली होती. या बॅगमध्ये असलेले आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड चोरट्याने वापर केला. चोराने सहज रेल्वे कर्मचाऱ्याची जन्म तारिख पिन म्हणून टाकली आणि ती तंतोतंत जुळली. त्यानंतर त्या चोराने एटीएम कार्डमधून तब्बल ७५ हजार रुपये इतकी रक्कम काढून घेतली. या प्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. तपासादरम्यान आरोपी हा पेशाने टीव्ही अभिनेता असल्याचं समोर आलं आहे. जिम सुदान असे त्याचे नाव आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित लोकेंद्र चौधरी २० जानेवारी रोजी लोकल ट्रेनमधून ठाण्याला जात असताना ही घटना घडली. जिम सुदान (वय वर्षे २८) या व्यवसायाने टीव्ही अभिनेता असलेल्या आरोपीने चौधरींची बॅग चोरली आणि त्या तो दादर स्थानकात लोकलमधून उतरला.
पिन म्हणून जन्मतारीख टाकली
बॅगेत सुदानला चौधरींचे पाकीट सापडले. ज्यात त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट कार्ड होते. त्याने त्यांची जन्मतारीख एटीएम पिन म्हणून वापरली आणि त्यांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यात तो यशस्वी झाला, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले. चौधरी यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरून रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसे काढले
“चौधरी यांना त्यांच्या बँकेतून पैसे काढल्याचा त्याच्या लोकेशनचा मेसेज मिळेल, याची जिमला माहिती होती. त्यामुळे पकडले जाऊ नये म्हणून त्याने तीन वेगवेगळ्या एटीएम सेंटरमध्ये जाऊन एकूण ५० हजार रुपये काढले,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
खरेदी केली सोन्याची अंगठी
सुदानने माहीम येथील एका दागिन्यांच्या दुकानात जाऊन चौधरी यांचे कार्ड वापरून 25 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी खरेदी केली. पोलिसांनी चौधरींच्या कार्ड स्वाइपिंग हिस्ट्रीचा तपास करुन ज्वेलरी स्टोअर गाठले आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. दुकानातून बाहेर पडल्यानंतर सुदानने टॅक्सी पकडल्याचे समोर आले.
चौकशीदरम्यान, जिम सुदानने सांगितले की त्याने वांद्र्याला जाण्यासाठी आधी टॅक्सी पकडली. तर तिथून तो राहत असलेल्या वसतिगृहात जाण्यासाठी त्याने रिक्षा पकडली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने ऑनलाइन रमी खेळताना चोरीचे पैसे गमावले.
“सुदानवर २०१६ मध्येही चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हाही त्याने बॅग चोरुन रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम कार्ड वापरले होते” असे पोलिसांनी सांगितले.