Home क्राईम डुग्गू सापडला मात्र सदिच्छा सानेसारखे असंख्य बेपत्ता कधी सापडणार?

डुग्गू सापडला मात्र सदिच्छा सानेसारखे असंख्य बेपत्ता कधी सापडणार?

323
0
डुग्गू सापडला मात्र सदिच्छा सानेसारखे असंख्य बेपत्ता कधी सापडणार?

डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण या चार वर्षीय चिमुरड्याचे पुण्यातील बाणेर परिसरातून अपहरण झाले होते. या चिमुरड्याला पुणे पोलिसांनी यशस्वीरित्या शोधून काढले आहे. या शोधात जवळपास ३०० हून अधिक पोलिस कर्मचारी झटले होते. दोन महिन्यांपूर्वी अशीच एक घटना मुंबई येथे घडली. बोईसर येथे राहणारी सदिच्छा साने ही २२ वर्षीय तरूणी मुंबईच्या बँडस्टँड परिसरातून बेपत्ता झाली होती. या घटनेच्या तपासाला दोन महिने उलटले आहेत, अद्याप या प्रकरणी कोणताही छडा लागलेला नाही.

सदिच्छा साने ही वैद्यकीय शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. ती परिक्षेनिमित्त २९ नोव्हेंबरला मुंबईत आली असताना अशी अचानकपणे बेपत्ता होण्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनेवर प्रकाश टाकण्यासाठी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनीदेखील यात लक्ष घालून काही सूचना केल्या. गृह विभागाकडून यात अधिक लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आले होते. असे असूनही सदिच्छा साने नेमकी कुठे आहे याचा उलगडा आजवर लागलेला नाही. या चौकशीत बँडस्टँड येथील सुरक्षारक्षक, सदिच्छाचा भाऊ तसेच इतर संशयितांची झाडाझडती सुरू आहे.

यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. मुंबईसारख्या शहरातून एक तरूणी बेपत्ता होते. महिना उलटूनही तिचा शोध लागत नाही. मुंबई पोलिसांनी महिला सुरक्षेसाठी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. एकट्या महिलेला निर्जन स्थळी संरक्षण देऊन योग्य ठिकाणी सुखरूप पोहचविण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेचा वापर करून पुणे शहरातील ४ वर्षीय डुग्गू सापडू शकतो तर २२ वर्षीय तरूणीचा शोध घेण्यात पोलिस प्रशासन कुठे कमी पडत आहे याचा विचार करायला हवा.

मुंबईतील मुलींची बेपत्ता होण्याची आकडेवारी

गृहविभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात प्रतिदिवसाला दोन ते तीन मुली बेपत्ता होत आहेत. मागील तीन वर्षाच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये १४८२ मुली बेपत्ता झाल्या असून त्यातील १४०० मुली शोधण्यात यश आले. २०२० मध्ये ८८९ प्रकरणापैकी ८४७ मुलींचा शोध लागला. २०२१ मध्ये ११५८ प्रकरणात १०४४ शोध लावण्यात यश आले आहे.

२०२० या वर्षी महाराष्ट्र राज्यातून ६३ हजार महिला बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी २३ हजार महिलांविषयीचे गुढ अद्यापही कायम आहे. तर २०२१ मध्ये ९९९ प्रकरणात ८५९ मुलींचा शोध लावण्यात आला आहे. गृहविभागाकडून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा असंख्य महिलांचा शोध महाराष्ट्र पोलिस कधी करणार हा विषय लक्ष वेधणार आहे.

Previous article‘बुल्ली बाई’ ॲपनंतर आता ‘क्लब हाऊस’वर मुस्लिम महिला टार्गेट
Next articleजुही चावलाची 5G बद्दलची भीती खरी ठरतेय? अमेरिकेत 5G लाँच झाल्यानंतर गोंधळाची स्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here