“बैठे बैठे क्या करें करना है कुछ काम, शुरू करो अंताक्षरी लेकर प्रभु का नाम”, असं म्हणत पुर्वीच्या काळी लोक मोकळा वेळ घालविण्यासाठी अंताक्षरी सारखा खेळ खेळायचे. हल्ली मोबाइल आल्यामुळे लोकांचा टाईमपास होतो. तरिही मित्रांसोबत बसून केलेला टाईमपास हा मोबाइलमध्ये वेळ घालविण्यापेक्षाही चांगला असतो. पुरुष मंडळी मोकळ्या वेळात जुगार खेळतात, हे चित्र जुने होते. आता महिलाही यात मागे नाहीत. उल्हासनगरमध्ये अट्टल जुगारी झालेल्या सात महिलांना नुकतेच पोलिसांनी रेड हँड पकडले आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेक्शन २२ येथे एका घरात सात महिला मिळून जुगार खेळत असायच्या. हळुहळु या महिलांना जुगाराची इतकी सवय लागली की, तो त्यांचा अड्डाच बनला. ज्या महिलेच्या घरात हा अड्डा चालायचा ती महिला सीटिंगमधून एक हजार रुपये काढून घ्यायची, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी जेव्हा या अड्ड्यावर धाड टाकली तेव्हा ४७ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
चाळीशीच्या आसपास वय असलेल्या या महिलांना घरात काही काम नसल्यामुळे त्यांचा वेळ जात नव्हता. यातूनच एकत्र येऊन पत्ते खेळण्याची कल्पना पुढे आली. तीन पत्ती खेळण्याच्या नादात या महिलांना जुगाराची लत लागली. या सातही महिलांची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक अधिनियम आणि साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.
विशेष म्हणजे सात पैकी दोन महिलांवर याआधी देखील काही प्रकरणात गुन्हे दाखल होते. त्यात त्यांना शिक्षाही झालेली आहे.