आतापर्यंत तुम्ही ‘एक्सटॉर्शन’ हा शब्द ऐकला असेल. बळजबरी करुन पैसे उकळणे, खंडणी मागणे याला आपण एक्सटॉर्शन म्हणतो. याच्या जोडीलाच आता ‘सेक्सटॉर्शन’ हा नवीन प्रकार प्रचलित होतोय. मागच्या महिन्यात पुण्यात अशाप्रकारच्या गुन्ह्यांच्या १५० तक्रारी दाखल झाल्या आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात मुंबईत पूजा शर्मा या फेक फेसबुक अकाऊंटने अनेकांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढले होते. मात्र या प्रकारात चूक फक्त आरोपीची नाही तर पीडित व्यक्तीची देखील असते. सध्या कोरोनामुळे सुरू असलेले लॉकडाऊन, या काळात वाढलेला इंटरनेटचा वापर यामुळे सेक्सटॉर्शनच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पोलिसांनाही या गुन्ह्यांचा छडा लावण्यात अपयश येतंय. कारण लोकलज्जेखातर निमुटपणे पैसे देणारे कथित इज्जतदार लोक याची वाच्यता करत नाहीत.
सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय?
विषयाला सुरुवात करण्याआधी सेक्सटॉर्शन म्हणजे नेमकं काय, हे समजून घेऊ. सेक्सटॉर्शनला तरुण, मध्यमवयीन आणि विशेषतः वृद्ध अधिक बळी पडतात. फेसबुक किंवा डेटिंग ॲपवर एखाद्याला पूजा शर्मा नावाच्या गोऱ्यागोमट्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. कधी कधी आपले अनेक मित्र तिचे म्युच्युअल फ्रेंड म्हणून दिसत असतात. म्हणून आपण चटकन ती रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करतो. थोडे दिवस त्या मुलीच्या प्रोफाईलवर घिरट्या घालून अधूनमधून लाईक, कमेंट सुरु होतात. कोण किती गुळ पाडतंय याचा अंदाज पूजा शर्मा नावाचे अकाऊंट चालवणारा हा गुन्हेगार घेत असतो.
आता तुम्ही म्हणाल की हे गुळ पाडणं म्हणजे काय? तर ही फेसबुकवर सर्रास वापरली जाणारी एक टर्म आहे. मुलींच्या फोटोला, स्टेटसला नेहमीच कमेंट करणारे, खोटं कौतुक करणारे लोक ‘गुळपाडे दादा’ म्हणून ओळखले जातात. अशा गुळपाड्या दादांना हेरल्यानंतर त्यातील सामाजिक प्रतिष्ठा असलेले कोण कोण आहेत, हे बघून त्यांची वेगळी यादी बनवली जाते आणि मग सिलसिला सुरु होतो चॅटिंगचा… चॅटिंगवरुन हळूहळू विषय फोन नंबरच्या देवाण-घेवाणीवर येऊन पोहचतो. एखाद्या नाजूक रात्री चॅटिंग करताना समोरची ललना व्हिडीओ कॉलवर बोलण्याची विनंती करते. आनंदाच्या भरात आपला गुळपाड्या दादा एका फटक्यात व्हिडीओ कॉलसाठी तयार होतो.. आणि तिथेच घात होतो!
समोरची ललना किंवा लाला पद्धतशीरपणे दादाला चेतवून स्वतःचे कपडे काढायला लावतो. त्याचे नग्नावस्थेतील रेकॉर्डिंग करण्याची सोय आधीच करुन ठेवलेली असते. एकदा का दादाचा नको तो (की त्यांना हवा तो) व्हिडीओ मिळाला की मग सुरु होतो सेक्सटॉर्शनचा हा खेळ…
लपून पॉर्न पाहणारेही सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात
सेक्सटॉर्शनचा दुसरा मार्ग म्हणजे असुरक्षित साईट (Unsecure Site) वरुन पाहिले जाणारे पॉर्न. तुम्ही जर मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन पॉर्न पाहत असाल तर सावधान व्हा. कारण मोबाईलमध्ये तुमचा ईमेल आयडी प्ले स्टोअर आणि गुगल क्रोमशी जोडलेला असतो. तुम्ही जे काही गुगलवर शोधता ते सर्व ‘तो वरुन पाहत असतो’. नाही, नाही, देव नाही.. तो हॅकर… तुम्ही https:// नसलेल्या साईटवर पॉर्न पाहत असताना हॅकर तुमचा ईमेल आयडी मिळवतो. त्याच्यावरुन तुम्हाला सोशल मीडियावर शोधलं जातं. तुम्हाला खासगी संदेश पाठवून तुमचे हे पॉर्न चाळे जगजाहीर करण्याची धमकी दिली जाते.
आता तुम्ही म्हणाल याला घाबरण्याची काय गरज? पण गृहस्थहो, अनेक आंबटशौकिन दादा याला बळी पडलेले आहेत. कारण अनेकांनी चोरी-छुपे कधी ना कधी पॉर्न पाहिलेले असते. एखादा सराईत ‘Incognito’ मोड ओपन करुन आपला एकांत साजरा करत असतो. पण बहुतांश लोक सरळसाध्या पद्धतीने इंटरनेटवर पॉर्नचा आनंद घ्यायला जातात आणि फसतात.
समजा हे पॉर्न पाहणारी एखादी तरुणी किंवा महिला असेल तर मग हॅकर्सचे काम अधिकच सोपे होते. कारण आपल्या समाजात महिलांनी पॉर्न पाहणे म्हणजे फारच बुवा अधोगती… त्यामुळे अशा महिलांचं सेक्सटॉर्शन करणं हॅकर्सना आणखी सोप्प जातं.
जम्मू-काश्मीरने तर कायदा केला राव
खरंतर सेक्सटॉर्शन हा प्रकार काही आता आलेला नाही. अमेरिका, युरोप या डिजिटल दृष्ट्या पुढारलेल्या देशांमध्ये तो आधीपासूनच होता. भारतातही अशा घटना अधूनमधून व्हायच्या. २०१८ साली जम्मू-काश्मीरमध्ये या गुन्ह्यांना कंटाळून तिथल्या सरकारने तर कायदाच केला आहे. सेक्सटॉर्शनवर बंदी आणणारे जम्मू-काश्मीर हे देशातील पहिले राज्य ठरलेय. अशाप्रकारच्या गुन्ह्यात आरोप सिद्ध झाल्यास कमीत कमी तीन वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. गुन्ह्याचे स्वरुप पाहून ही शिक्षा पाच वर्षांपर्यंत वाढविण्याची देखील तरतूद आहे.
नुकतेच दिल्ली पोलिसांनी एका सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. नुकतीच मिसरुड फुटलेली तरुण मुलं या गुन्ह्यांची मास्टरमाईंड निघाली. त्यांना फक्त पैशांशी मतलब असतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा, तुमचे वय याच्याशी त्यांना काही एक देणेघेणे नसते. त्यामुळे तुमचा व्हिडीओ किंवा फोटो ते बिनधास्त सोशल साईटवर अपलोड करण्याची धमकी देतात.
.@DelhiPolice's CyPAD Unit has arrested six accused from Bharatpur, Rajasthan for running an online extortion gang. They made compromising videos after showing adult porn videos to the victims during video calls after befriending them online. @LtGovDelhi @CPDelhi@Cyberdost pic.twitter.com/qrHw6biFPe
— DCP Cybercrime (@DCP_CCC_Delhi) January 6, 2021
इथे सांगितल्याप्रमाणे मुंबई पोलिसांनीही फेब्रुवारी २०२१ मध्ये पूजा शर्मा या फेक अकाऊंटचा पर्दाफाश केला होता. उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून तिघांना अटक केली होती. त्यानंतर फेसबुकवरील जवळपास १५० पूजा शर्मा नामक फेक अकाऊंट बंद करण्यात आले होते. तरीही अशी फेक अकाऊंट तयार होतच राहतात.
:: सायबर पोलीस ठाणे, बीड तर्फे जनहितार्थ. ::
सेक्सटॉर्शन म्हणजे काय ? pic.twitter.com/r7Fj2lXsUQ— SPBeed (@BEEDPOLICE) April 13, 2021
सेक्सटॉर्शनबद्दल वाचायला, ऐकायला कदाचित गंमत वाटत असेल, पण तेवढीच विचित्र अवस्था त्याचे बळी पडल्यावर होईल. त्यामुळे आपला एकटेपणा घालविण्यासाठी जर तुम्ही इंटरनेट आणि सोशल मीडियावर पडीक असाल तर वेळीच सावध व्हा…
सेक्सटॉर्शन पासून वाचण्यासाठी खालील युक्त्या वापरू शकता
– फेसबुकवर एखाद्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास हपापल्यासारखे लगेच ॲक्सेप्ट करु नका.
– म्युच्युअल फ्रेंड दिसत असले तरी रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करु नका. उलट तुमच्या मित्रांनाही समज द्या.
– व्हॉट्सॲप किंवा अन्य माध्यमातून येणारे व्हिडीओ कॉल घेऊ नका, घेतलाच तर जरा सद्सद्विवेकबुद्धी वापरा.
– पॉर्न बघण्यासाठी असुरक्षित साईटवर जाऊ नका. (म्हणजे जाऊच नका ना.)
– इतकी खबरदारी घेऊनही या जाळ्यात अडकलाच तर धमकी देणाऱ्यांना अजिबात पैसे देऊ नका. एक फोन सायबर सेलला करा. मग पुढचं तेच पाहून घेतील. बाकी सूज्ञांना अधिक सांगणे न लगे..