सध्याच्या काळात अनेक स्टार किड्स आपल्या आई-वडिलांच्या पाऊलांवर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. श्रीया पिळगांवकर, अभिनय बेर्डे, सई मांजरेकर, शुभंकर तावडे, सखी गोखले, विराजस कुलकर्णी सारख्या स्टार किड्सनी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. यात आता अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर याची देखील भर पडली आहे. सोहम स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ही मालिका आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सच्या माध्यमातून निर्मित करण्यात आलेली आहे. आदेश बांदेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी बऱ्याच कार्यकर्मांचे सूत्रसंचालन केले आहे. त्यातील त्यांचे होम मिनिस्टर हा फारच गाजलेला कार्यक्रम ठरला आहे. अभिनयासोबतच ते राजकिय क्षेत्रात देखील काम करत आहे. ते शिवसेने पक्षाचे सदस्य व सचिव आहेत. आदेश यांची पत्नी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर या देखील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेले आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी अनेक वर्ष कलाविश्वात आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता सर्वांनाच सोहमच्या पदार्पणाची उत्सुकता लागली आहे.