बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असते. पीसीच्या अभिनयाबरोबरच तिच्या फँशन स्टेटमेंटला देखील तोड देणे सोपे नाही. ग्लॅमरस लूकपासून ते पारंपारिक साड्यांपर्यंतचे लूक परिधान करून ती स्टायलिश दिसण्याची संधी कधीच चुकवत नाही. बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्येही तिच्या पेहरावासाठी नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असलेली प्रियंका यावेळी तिच्या स्टाईलमुळेच ट्रोल झाली आहे.
अलिकडेच प्रियंकाने एक युनिक ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस हिरव्या रंगाचा असून त्याचा आकार हा मोठ्या बलून सारखा दिसून येत आहे. तिला या ड्रेसवरून सोशल मिडियावर भन्नाट ट्रोल करण्यात आले आहे. या ड्रेसवरून सोशल मिडियावर बरेच मिम्स बनवण्यात आलेत. हे मिम्स पाहून खुद्द प्रियंकाला देखील हसू आवरलेले नाही. नुकतेच तिने तिच्या ट्विटरवर काही मिम्स शेअर केले आहेत. त्यावर, ”हे खूपच मजेदार आहे. माझा दिवस बनवण्यासाठी तुमचे आभार मित्रांनो.” असे लिहित तिने हे मिम्स शेअर केले आहेत. असंख्य मिम्स तिच्या या ड्रेसवरून सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. कुणी तिला हॉट बलून म्हंटलयं तर कोणी सुतळी बॉम्ब. कोणी तिची तुलना लॉलीपॉपसोबत केलीये तर कोणी पोकेमॉनसोबत.
प्रियंकाने आजवर सेक्सी ड्रेसेस, हाय स्लिट गाऊन, मोनोक्रोम्याटिक ड्रेसेस, पेन्सिल गाऊन सारखे वेगवेगळे ड्रेसेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतू बरेचदा तिला या ड्रेसेसमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे.