बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनाला काल तीन वर्षे पूर्ण झाली. काल श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. श्रीदेवी यांचे असंख्य चाहते आहेत जे अजूनही श्रीदेवींना विसरू शकले नाहीत. त्यातील श्रीदेवींचा एक असाही चाहता आहे, ज्याने श्रीदेंवी मनोमनी पत्नीचा दर्जा दिलेला आहे. श्रीदेवींच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभा आयोजित केली होती.
श्रीदेवींचा हा चाहता मध्यप्रदेशमधील ददुनी या छोट्याशा गावातील आहे. ओमप्रकाश असे या चाहत्याचे नाव आहे. ओमप्रकाश यांचे वय ५७ वर्षे आहे. ते अद्यापही अविवाहित आहेत. ते अविवाहित असण्याचे कारणही तरचं आहे. त्यांनी श्रीदेवींना मनोमनी पत्नीचा दर्जा दिलेला आहे. १९८६ साली ओमप्रकाश यांनी श्रीदेवींना पन्ती मानले होते. त्यानंतर त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचा घरच्यांनी विरोध केला. पण ओमप्रकाश यांनी कोणाचेही न ऐकता श्रीदेवींना पत्नी मानले होते.
२०१८ साली श्रीदेवींचे निधन बाथटबमध्ये बुडून झाले होते. यावेळी श्रीदेवींच्या निधनाची बातमी ऐकून ओमप्रकाश फार खचले होते. त्यांच्या निधनानंतर एका पतीप्रमाणे ओमप्रकाश यांनी सर्व अंतिमविधी केले होते. मुंडन करून त्यांनी सगळे विधी पूर्ण केले होते. श्रीदेवींना एकदा तरी भेटण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. पण त्यांची आणि श्रीदेवींची भेट पुढील जन्मात तरी नक्की होईल, अशी त्यांची आस कायम आहे.