Home मनोरंजन आरक्षणाचे जनक “राजर्षी शाहू महाराज” यांच्या जीवनावर भव्य चित्रपट; जितेंद्र आव्हाड करणार...

आरक्षणाचे जनक “राजर्षी शाहू महाराज” यांच्या जीवनावर भव्य चित्रपट; जितेंद्र आव्हाड करणार निर्मिती

184
0
Shahu Chatrapati Biopic
‘शाहू छत्रपती’ हा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे यंदा स्मृतिशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता म्हणून जबाबदारी उचलली आहे. ज्येष्ठ लेखक आणि राजर्षी शाहू महाराजांचे चरित्रकार डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संशोधनावर आधारीत या चित्रपटाची कथा असणार आहे. तर युवा दिग्दर्शक वरुण सुखराज चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘विद्रोह फिल्म्स’ या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

गेल्या काही काळापासून मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक विषय आणि महापुरूषांच्या जीवनावर आधारीत चरित्रपट तयार होत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचीही चांगली पसंती मिळत आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते. महात्मा जोतीराव फुले यांची सत्यशोधक चळवळ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक मदत करुन नेता म्हणून घडविण्यात शाहू महाराज यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

भारतात आरक्षण या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळवून दिला. मात्र त्याआधी १९ व्या शतकाच्या प्रारंभीच शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू केले होते. प्रत्येक जातीला शिक्षण घेता यावे यासाठी विविध शाळांची आणि वसतिगृहाची निर्मिती शाहू महाराजांनी केली होती. काळाच्या पुढे जाणारे हे निर्णय त्या काळात त्यांनी घेतले. एका बाजूला ब्रिटीश राजवट, दुसऱ्या बाजूला सनातनी विचारांचा मोठा पगडा असतानाही राजर्षी महाराजांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी क्रांतिकारी निर्णय घेतले.

राजर्षी शाहू महाराज यांच्यासारख्या युगपुरुषाची जीवन कहाणी मोठ्या पडद्यावर येण्यास उशीर झाला असला तरी योग्य संशोधन आणि एका चांगल्या टीमकडून त्याचे सादरीकरण होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक वरुण सुखराज यांनी नुकतीच ‘Too Much Democracy’ नावाची डॉक्युमेंटरी दिग्दर्शित केली होती. दिल्लीच्या सीमेवर एक वर्षाहून अधिक काळ चाललेले कृषी कायद्याविरोधातील आंदोलन या डॉक्युमेंटरीमध्ये अतिशय प्रभावीपणे चित्रित करण्यात आले होते. देशातील शेतकरी नेते, राजकीय पुढारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी या डॉक्युमेंटरीचे भरभरून कौतुक केलेले आहे. सामाजिक आशय उत्तमरीत्या टिपणारे वरुण सुखराज ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाला देखील उत्तम न्याय देतील, असा विश्वास व्यक्त केला जातोय. तसेच बहुजन नेतृत्व म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो ते डॉ. जितेंद्र आव्हाड याची प्रस्तृती करत असल्यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरेल.

Previous article“पॉलिटिकल बायोपिक” मधून पॉलिटिकल अजेंडा रेटण्यासाठी सिनेमास्त्राचा वापर होतोय?
Next articleखासदार सुप्रिया सुळे; मराठी मातीतलं मुलखावेगळं नेतृत्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here