कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम हळहळू विविध क्षेत्रांवर पाहायला मिळत आहे. मनोरंजन क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होत आहे. चित्रपटगृह आणि नाट्यगृहांच्या प्रेक्षक संख्येत गेल्या काही दिवसात घट झाल्याचे आढळून आले. याचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राच्या अर्थकारणावर बसत आहे.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या दोन लाटातून सावरून आता कुठे मनोरंजन क्षेत्राची घडी सुरळीत बसत होती. त्यातच पुन्हा आता कोरोनाने डोके वर काढले. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने नाट्यगृहात आणि चित्रपटगृहात येणारा प्रेक्षक पुन्हा धास्तावला आहे. गेल्या आठवड्यापासून प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे.
राज्य सरकारने कोरोना नियमावली पाळून नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना परवानगी दिली. त्यानंतर घरी बसून कंटाळलेल्या रसिकांनी नाटकाच्या प्रयोगाला भरघोस प्रतिसाद दिला. अनेक नाट्यप्रयोगाच्या बाहेर हाऊसफुल्ल बोर्ड झळकले होते. परंतु जसे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. त्यानंतर प्रेक्षकवर्ग कमी कमी होत आहे.
कोरोनाचा संक्रमण वाढले तसेच लॉकडाऊन होणार अशा चर्चा होऊ लागल्यानंतर प्रेक्षकवर्ग धास्तावला. कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही नाटकाचे प्रयोग करतो. तरी देखील गेल्या आठवड्यापासून नाटकाचे बुकींग कमी झाले असून येणारा प्रेक्षक संख्येत घट झाली आहे, अशी माहिती अद्वैत थिएटर्सचे निर्माते राहुल भंडारे यांनी दिली. तसेच या सर्वांचा मोठा परिणाम नाट्यक्षेत्रातील अर्थकारणावर होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
—
लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनाची साधने म्हणजे थिएटर आणि नाट्यगृह बंद असल्याने बऱ्याच प्रमाणात प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला. त्यांचा काहीसा परिणाम चित्रपटगृहांवर पाहण्यास मिळतो. चित्रपटगृह सुरू झाल्यावर येणारा प्रेक्षक आता कोरोनाच्या भीतीने पाठ फिरवत असल्याने चित्रपटगृहाचे मालक पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत.