Home ताज्या बातम्या दिल्लीत झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक!

दिल्लीत झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक!

264
0

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनीसुद्धा विजयी महाराष्ट्र संघाचे व सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केले आहे. एकूण १५ संघ सहभागी असणाऱ्या या स्पर्धेत, महाराष्ट्राच्या संघाने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्ली येथील राजपथावर चित्ररथाचे संचलन होत असते. या संचलनामध्ये विविध राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. यावर्षी महाराष्ट्राचा ‘महाराष्ट्रातील जैवविविधता व जैव मानके’ या चित्ररथाचे संचलन होणार आहे. चित्ररथ संचलनात सहभागी झालेल्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते.
यावर्षीच्या स्पर्धेमध्ये एकूण १५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले होते. विविध राज्ये व केंद्र शासनाच्या विभागांनी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण केले होते.

महाराष्ट्रातील ‘भैरी भवानी परफॉरमिंग आर्ट्स’ या लोककला समूहाने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण १४ कलाकारांनी भाग घेतला. चषकाच्या स्वरूपातील हे पारितोषिक, महाराष्ट्रातील जनता व कलासंपन्नतेला समर्पित करत असल्याची असल्याची भावना ‘भैरी भवानी परफॉरमिंग आर्ट्स’चे प्रमुख अमेय पाटील यांनी व्यक्त केली. या कला सादरीकरणामध्ये अमेय पाटील, भावना चौधरी, संजय बलसाने, शिल्पेश तांबे, सुशांत पवार, पारस बारी, हरिश्चंद्र कोटीयन, अशोक जिंका, हिमानी दळवी, प्राजक्ता गवळी, तेजस गुरव, विशाखा मोरे, वैदेही मोहिते, निधीशा सॅलियन, किरण जुवळे, अंकिता पाटलेकर या कलाकारांनी भाग घेतला. त्यांच्या या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याबरोबरच, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय व संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केलेले ट्विट

https://twitter.com/AmitV_Deshmukh/status/1484800384824938496

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता सर्वांच्या नजरा चित्ररथ संचलनाकडे लागल्या आहेत. याआधी २०१५ आणि २०१८ साली महाराष्ट्राने चित्ररथ संचलनामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. यावर्षीसुद्धा आपण पहिला क्रमांक पटकावणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Previous articleमुंबईकरांनो सावधान! हवेच्या गुणवत्तेने गाठली धोकादायक पातळी
Next article“झुकेगा नहीं साला” कर्नाटकच्या शेतकऱ्याने अर्ध्या तासात घेतली १० लाखाची गाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here