भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेटचे मैदान गाजवले. आता महेंद्र सिंग धोनी नवे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. महेंद्र सिंग धोनी नव्या ॲनिमेटेड वेब सिरीजच्यामाध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. ‘अथर्व: द ओरिजिन'(Atharva-The Origin)या ॲनिमेटेड वेबसीरिजचा फर्स्ट लुक टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये धोनी राक्षसांचा वध करताना दिसत आहे.
टीझरमध्ये धोनीचा सुपरहिरो अवतार पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. याचे लेखन थमिलमणी यांनी केले आहे, तर आदिकलराज आणि अशोक मनोज यांनी निर्मिती केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर भारतातील पहिला पौराणिक अवतारतील सुपरहिरो आजच्या काळ्यातील संदर्भ देत लॉन्च करण्याचा प्रयत्न या ॲनिमेटेड ग्राफिक वेब सिरीजच्यामाध्यमातून करण्यात आला आहे. धोनी हा या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत बाहुबलीमधील अभिनेता प्रभासच्या योद्धा लुकची भुरळ रसिकांना पडली होती. आता महेंद्र धोनी सिंगच्या या नव्या योद्धा लुकची चर्चा असून प्रेक्षकांमध्ये त्याच्या नव्या वेबसिरीजबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
या ग्राफिक नॉव्हेलची घोषणा 2020मध्ये झाली होती. फर्स्ट लुकमध्ये धोनी युद्धभूमीवर ॲनिमेटेड अवतारात दिसत आहे. यामध्ये तो राक्षसांचा संहार करताना दिसत आहे. त्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित होताच धोनीच्या चाहत्यांनी त्यांच्या या नव्या लुकला प्रचंड पसंती दिली.