कोरोनावर आळा घालण्यासाठी राज्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहिम कडक करण्यात आलेली आहे. नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. अशातच बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांना देखील कोरोनाचे नियम मोडल्याचा चांगलाच फटका बसला आहे. १ जून रोजी टायगर आणि दिशा मुंबईतील वांद्रे येथील बॅण्डस्टॅंड येथे कारमधून फेरफेटका मारत असताना मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर FIR दाखल केला आहे.
एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दिशा-टायगर मंगळवारी रोजी जीममधून परत येत होते, त्याचवेळी ते वांद्रे परिसरात बॅण्डस्टॅंड परिसरात फेरी मारताना दिसून आले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांची गाडी थांबवल्यानंतर पोलिसांनी दोघांचीही विचारपूस केली. विचारणा करताना दोघांकडे घराबाहेर पडण्याचे कोणतेही वैध्य कारण सांगत न आल्याने पोलिसांनी दोघांचेही आधार कार्ड तपासले व अन्य अपौचारिक तपासणी केली. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन दिशा व टायगरने न केल्याने या दोघांवर FIR दाखल करण्यात आला आहे.
In the ongoing ‘War’ against the virus, going ‘Malang’ on the streets of Bandra cost dearly to two actors who have been booked under sections 188, 34 IPC by
Bandra PStn . We request all Mumbaikars to avoid unnecessary ‘Heropanti’ which can compromise on safety against #COVID19— Mumbai Police (@MumbaiPolice) June 3, 2021
दिशा व टायगरवर FIR दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांना लोकांना सावध करण्यासाठी व नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याची विनंती करत मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक मजेशीर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये टायगर व दिशाच्या चित्रपटांच्या नावांचा उल्लेख आहे. मुंबई पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या ‘वॉर’मध्ये रस्त्यावर ‘मलंग’ होऊन फिरणे दोन कलाकारांना महागात पडले असून त्यांच्याविरोधात वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये कलम १८८, ३४ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही सर्व मुंबईकरांना विनंती करतो की कोरोना काळात अनावश्यक ‘हिरोपंती’ करणे टाळा.’ या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी दिशा-टायगरच्या नावाचा उल्लेख तर केला नाही परंतू मुंबईकरांना इशारा दिला आहे की हिरोपंती त्यांना कशाप्रकारे महागात पडू शकते.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी १५ जूनपर्यंत ल़ॉकडाऊन लागू केला आहे. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी शिथिलता देण्यात आली आहे. परंतू दुपारी २ नंतरही दिशा-टायगर फिरताना दिसून आल्याने त्यांच्यांवर ही कारवाई करण्यात आलेली आहे.