शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला “धर्मवीर – मु.पो. ठाणे” हा चित्रपट मोठा गाजावाजा करत आज प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टर लाँच पासून ते रिलीजपर्यंत अनेक पीआर इव्हेंट करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सलमान खान आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. चित्रपट लोकप्रिय करण्यासाठी सगळे फंडे वापरण्यात आले. धर्मवीरच्या निमित्ताने पॉलिटिकल बायोपिकची चर्चा पुन्हा जोरदार सुरु झालीये. योगायोगाने याच महिन्यात ९ मे रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने समाजाला धर्मवीर नको तर कर्मवीर हवेत, अशा आशयाच्या “लाईक मार” (टाळीबाज या शब्दाऐवजी सोशल मीडिया सॅव्ही शब्द) पोस्ट लिहिल्या गेल्या. पॉलिटिकल बायोपिकमधून एखाद्या व्यक्तीचा जीवनपट उलगडत असतानाच बिटव्हन द लाईन्स अनेक अजेंडे सेट केलेले दिसतात. त्याचीच चर्चा या लेखात करुयात.
धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने देखील अनेकांचं हित साधलं गेलंय. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकाला चित्रपट हिट झाल्यानंतर आर्थिक लाभ होतोच. मुख्य कलाकारासहीत इतरांनाही पैसा, प्रतिष्ठा मिळते. धर्मवीरमध्ये आनंद दिघे यांचा जीवनपट दाखवतानाच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचेही पात्र मोठ्या खुबीने रंगवले आहे. एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत ‘हातभार’ लावला असल्याचे सांगितले जाते. धर्मवीरमध्ये गुरुपौर्णिमेच्या गाण्यात दिघे आणि शिंदे यांचेही नाते उलगडून दाखविण्यात आले आहे. एकूणच ठाणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक, ठाण्यातील बदलती राजकीय गणिते, इतर पक्षातील (राष्ट्रवादीचे आव्हाड, मनसेचे जाधव) नेत्यांचा होत असलेला उदय या पार्श्वभूमीवर ठाण्यात पुन्हा शिवसेनेचा बोलबोला करण्यासाठी हा चित्रपट फायदेशीर ठरु शकतो.
बायोपिक हा चित्रपटाचा प्रकार आता प्रत्येकाच्या परिचयाचा झालाय. क्रीडा, कला, संगीत आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या आयुष्यावरील बायोपिकचं पिक जोरात आहे. त्यातच मागच्या काही काळापासून पॉलिटिकल बायोपिकही येऊ घातलेत. इतर बायोपिकप्रमाणे पॉलिटिकल बायोपिकमध्ये फक्त पैसा कमवणे हा हेतू नसतो. धर्मवीर प्रमाणेच त्याला अनेक पॉलिटिकल कंगोरे असतात.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे हा सिनेमाचा पहिला भाग काही दिवसापुर्वी येऊन गेला. मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं, तर संजय राऊत यांच्या पत्नी आणि दोन मुलींनी त्याची निर्मिती केली होती. बाळासाहेबांच्या जीवनावर आधारीत सिनेमा असला तरी त्यात सिलेक्टिव्ह बाळासाहेब दाखविण्यात आले होते. बाळासाहेबांच्या एकेकाळी जवळ असणारे राज ठाकरे केवळ एका फ्रेममध्ये दिसले. तर नारायण राणे, छगन भुजबळ यांना या चित्रपटातून सोयीस्कररित्या वगळण्यात आलंय. (निदान पहिल्या भागात तरी) ठाकरेमधून केवळ आणि केवळ ठाकरे यांची लार्जर दॅन लाईफ इमेज दाखवताना त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींची सोयीस्कर बेरीज-वजाबाकी करण्यात आली.
महाराष्ट्राप्रमाणेच भारतातील इतर राज्यातही पॉलिटिकल बायोपिक साकारले गेले आहेत. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावरील ‘थलाइवी’, तेलगू देसम पार्टीचे संस्थापक एनटी रामाराव यांच्यावर ‘एनटीआर कथानायकुडू’, वायएसआर रेड्डी यांचा जीवनावरील ‘यात्रा’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ असे अनेक बायोपिक येऊन गेले. प्रत्येक सिनेमात निर्माते, दिग्दर्शकांनी स्वतःचा काहीना काही अजेंडा रेटलेला आहेच.
यापुर्वी देखील सिनेसृष्टीत राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारीत अनेक चित्रपट येऊन गेले. नेत्यांचा नामोल्लेख टाळून केवळ त्यांची शैली वापरुन एखादे पात्र रंगवले जायचं. सिंहासन, वजीर, झेंडा, सामना ही काही उत्तम राजकीयपट असलेले सिनेमे मराठीत होऊन गेले. हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्येही राजकारणावर आधारीत चिक्कार सिनेमे झाले. मात्र बायोपिकमुळे एका वेगळ्या पद्धतीने राजकारणाचा, राजकीय नेत्यांचा प्रचार होऊ लागलाय. याचाच धागा पकडून आता इतरही बायोपिक येऊ घातले आहेत. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या आयुष्यावरही बायोपिकची चाचपणी सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरील बायोपिकसाठी अभिनेता सुबोध भावेने त्यांची मागे भेट घेतली होती. महाराष्ट्रातील इतरही पॉवरपॅक नेत्यांचे बायोपिक व्हावेत, म्हणून त्यांचे कुटुंबिय प्रयत्नशील आहेतच.
हल्ली सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन न राहता त्याचा सिनेमास्त्रासारखा वापर खूप होतोय. उरी, कश्मीर फाईल्स, द ताश्कंद फाईल्स, इंदू सरकार, अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, टॉईलेट एक प्रेमकथा अशा अनेक चित्रपटातून एका पक्षाची प्रतिमा उंचावून दुसऱ्या एका पक्षाची पडती बाजू दाखविण्याचा प्रयत्न दिसून आला. चित्रपटाची कथा जरी सत्य घटनांवर आधारीत असल्या तरी त्याचे स्टोरीटेलिंग हे अजेंडा सेट करणारेच असते. त्यामुळे प्रेक्षकांनी बायोपिक पाहताना किंवा कोणतेही सिनेमे पाहताना त्याला सत्य घटना न मानता केवळ मनोरंजन म्हणून पाहावे…