डान्स रिॲलिटी शो इंडियाज बेस्ट डान्सरच्या (India’s Best Dancer 2) दुसऱ्या पर्वाचा ‘बेस्ट का नेक्स्ट अवतार’ मिळाला आहे. पुण्याची मराठमोळी सौम्या कांबळे इंडियाज बेस्ट डान्सरच्या दुसऱ्या पर्वाची विजेती झाली आहे. विशेष म्हणजे सौम्याला तब्बल १५ लाखांचा धनादेश देत तिचा सन्मान करण्यात आला आहे. सौम्याला गिफ्ट म्हणून स्विफ्ट कार(Swift Car) देखील देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर सौम्याची कोरियोग्राफर असलेल्या वर्तिका झा ला सुद्धा पाच लाख रुपये मिळाले. सर्वोत्कृष्ट ५ फायनलिस्टमध्ये जयपूरचा गौरव सरवन हा पहिला तर ओडिशाचा रोसारना हा दुसरा उपविजेता ठरला.
विजेतेपदाची ट्रॉफी जिंकल्यानंतर सौम्या म्हणाली की, “मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी खूप भावूक झाले आहे. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला इथपर्यंत येण्यासाठी मदत केली आणि सपोर्ट केला आहे. विशेषत: या शोमध्ये माझी कोरिओग्राफर वर्तिका दीदी जी या प्रवासात माझ्यासोबत राहिली. मी त्यांची खूप ऋणी आहे. मलायका मॅडम, टेरेन्स सर आणि गीता मा या सर्व जजचेही मी आभार मानते.”
सुप्रसिद्ध गायिकाआशा भोसले यांनी दिली छोटी हेलनची पदवी.
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले देखील सौम्याच्या मोठ्या फॅन आहेत. आशा भोसले शोमध्ये आल्या होत्या त्यावेळी तिचा डान्स पाहून त्या खूप प्रभावित झाल्या आणि त्यांनी सौम्याला छोटी हेलनचीच पदवी दिली. महाअंतिम फेरीमध्ये सौम्याने वर्तिकासोबत बेली डान्स आणि फ्री-स्टाईल ॲक्ट केले. विजेता झाल्यावर सौम्याने सांगितले की, तिच्या आईचे स्वप्न आहे की, तिने डान्सर म्हणून नाव मोठे करावे तर सौम्याच्या वडिलांची इच्छा आहे की, तिने डॉक्टर व्हावे. विशेष म्हणजे या अगोदर सौम्याला नोरा फतेहीने बेली डान्सिंग कॉईन बेल्ट गिफ्ट म्हणून दिला आहे.
सौम्याची पहिली गुरू आईच!
सौम्या ही पुण्याची स्थायिक आहे. तिचे वडिल पेशाने डॉक्टर आहेत तर आई स्वत: एक डान्सर आहे. तिच्या आईकडूनच तिने डान्सचे सुरूवातीचे धडे घेतले आहेत. विशेष म्हणजे सौम्या गेल्या दहा वर्षांपासून बेली डान्स शिकते आहे. लहानपासून सौम्याला शोजमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, बरेच प्रयत्न करूनही तिला संधी मिळत नव्हती. मात्र ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ मधून मिळालेल्या संधीचे सौम्याने अखेर सोने केले.