केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर उत्तरेतील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक असे आंदोलन केले. शेतकरी आंदोलनाला अनेक कंगोरे आहेत. या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला पाठिंबा, शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्राची कार्यपद्धती, माध्यमांनी केलेले वार्तांकन आणि आंदोलन काळात विविध कारणांनी ७०० शेतकऱ्यांचे झालेले मृत्यू. या सर्व बाबींचे व्हिज्युअल डॉक्युमेंटशन अनोखी पब्लिकेशन्सचे प्रमुख आणि ज्येष्ठ पत्रकार पराग पाटील यांनी करण्याचा निर्णय घेतला. कबूतर डॉयलॉग या संस्थेसोबत एकत्र येत ‘Too Much Democracy’ या डॉक्यूमेंटरीची निर्मिती पराग पाटील यांनी अनोखी पब्लिकेशन्स या संस्थेतर्फे केली आहे. नुकतेच देशाचे माजी कृषीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत या डॉक्यूमेंटरीचा प्रीव्ह्यू सादर करण्यात आला.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील मुख्य सभागृहात ‘Too Much Democracy’चा प्रीव्ह्यूला शरद पवार यांच्यासोबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार अतुल बेनके, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार विद्या चव्हाण, पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि या डॉक्यूमेंटरीसाठी योगदान देणारे मान्यवर उपस्थित होते.
कबूतर डॉयलॉग या संस्थेच्या वरुण सुखराज यांनी या डॉक्युमेंटरीचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. आंदोलनाच्या काळात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर वर्षभरातील अनेक घडामोडींचा मागोवा त्यांनी घेतला. कॅमेरामननी शेतकऱ्यांच्या भावभावना अतिशय अचूक पद्धतीने टीपल्या आहेत. ९० मिनिटांच्या या डॉक्यूमेंटरीमध्ये सप्टेंबर २०२० साली जेव्हा संसदेत तीन कृषी विधेयके मंजूर झाली त्यानंतर ५ नोव्हेंबर २०२० पासून सुरु झालेल्या आंदोलनापासून ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेपर्यंतचा सर्व आढावा घेण्यात आला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ, दिल्ली येथे वार्तांकन करणारे प्रशांत कदम अशा अनेक मान्यवरांच्या मुलाखती या डॉक्युमेंटरीत समाविष्ट आहेत.
डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. छगन भजुबळ यांची उस्फुर्त प्रतिक्रिया
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येते प्रीव्ह्यू संपन्न झाल्यानंतर अनोखी पब्लिकेशन्सचे प्रमुख पराग पाटील यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “कोविड काळात अतिशय खडतर परिस्थितीत टीम अनोखीने या आंदोलनाचे कव्हरेज केलं. ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता ज्याप्रमाणे शेतकरी आंदोलन करत होते, त्याप्रमाणेच अनोखी पब्लिकेशन आणि कबूतर डॉयलॉगच्या टीमने या आंदोलनाचे डॉक्यूमेंटेशन करुन एक उत्तम फिल्म बनवली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलेच न भुतो, न भविष्यती अशा स्वरुपाचे हे आंदोलन होते. अहिंसक पद्धतीने सुरु असलेले हे आंदोलन भारतीय लोकशाहीचे खरेखुरे प्रतिबिंब होते. त्यामुळेच याचे डॉक्युमेंटेशन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. मोठी जोखीम पत्करून आमच्या सर्व टीमने हे कार्य केले.”
‘Too Much Democracy’ च्या प्रीव्ह्यूनंतर खासदार शरद पवार, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्वांनीच या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. एका ऐतिहासक आंदोलनावर तितकीच उत्तम डॉक्युमेंटरी तयार केल्याबद्दल सर्व टीमचे आभार व्यक्त केले. तसेच अधिकाधिक लोकांपर्यंत ही डॉक्युमेंटरी पोहोचावी, यासाठी निर्मात्यांना शुभेच्छा दिल्या. लवकरच जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील फिल्म फेस्टिव्हल आणि त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘Too Much Democracy’ ही डॉक्यूमेंटरी पाहायला मिळेल, अशी माहिती पराग पाटील यांनी दिली.