धर्म संकल्पना आपल्या देशात प्रस्थापित होताना अनोखे रंग लेवून आल्या. आपला देश मुळात विविधतेने नटलेला. अनेक भाषा, सभ्यता, संस्कृती, जाती, संप्रदाय, वांशिक विविधता. त्यामुळे धर्माचा रंग हा निजखूण जपण्यासाठी महत्त्वाचा.
परवा कोणा नटीने घातलेल्या बिकिनीच्या भगव्या रंगामुळे कट्टर विचाराचे खवळले. भगवा हा हिंदू धर्माचा रंग असा त्यांचा दावा. त्यामुळे अर्थातच पवित्र मानला गेलेला. म्हणून मग बिकिनीतल्या अल्पवस्त्रांकितेने अप्रत्यक्षरीत्या या भगव्याचे पावित्र्य बिघडवले असा अन्वयार्थ लावला गेला.
फार पूर्वी चिंचपोकळीच्या पुलावर लंगोट विकायला असायचे. त्यात लाल आणि भगव्या रंगाचे लंगोटही टांगलेले असायचे. तालमीतले अनेक पैलवानी थाटाचे लोक हे भगवे लंगोट वापरायचे. अर्थात त्यामुळे पावित्र्य बिघडलं नाही कधी.
मानवी आयुष्य आपण प्रतिमा आणि चिन्हांशी जोडलेलं असतं. मात्र प्रतिमा माणसांसाठी की माणूस प्रतिमांसाठी असा प्रश्न निर्माण होतो. प्रतिमांच्या या खेळात अर्थातच रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. धर्माचं दर्शनी रूप या रंगांशी मांडलं गेलं.
मुळात हिंदुत्वाचा रंग भगवा नाही. हिंदुत्वाचा मूळ रंग हा पिवळा. सूर्य, अग्नी, सोने आणि पितांबर ही हिंदू धर्म संकल्पनांमधील पिवळी प्रभावळ. सनातन संस्थेचा झेंडा ज्या रंगाचा आहे तो ओरिजिनल पिवळा रंग हिंदूंचा. काशी-वाराणसीत फिरताना अनेक हिंदू मठांच्या पताका पिवळ्या रंगाच्या दिसतात. मग हा भगवा रंग कुठून आला आणि तो पिवळ्याच्या कानामागून येऊन पावित्र्याच्या बाबतीत तिखट कधी झाला.
मुळात अग्नितत्व हिंदू धर्मात वैदिक काळात महत्त्वाचं मानलं गेलं होतंच. त्याच्याशी निगडित पिवळा रंग धर्माचं प्रतीक म्हणून कित्येक शतके राहिला. हिंदू सभ्यतेतली एक गंमत लक्षात घेतल्याशिवाय या रंगांचे भेद कळणार नाही.
हिंदू परंपरेत गृहस्थाश्रम आणि वैराग्य या दोन गोष्टी समजून घ्याव्या लागतात.
शैव हे वैराग्याचा मार्ग अंगिकारणारे तर वैष्णव गृहस्थाश्रमाचा. शंकर महादेव हे कैलासावर पर्वतात किंवा स्मशानांमध्ये राहणारे. अंगाला राख फासणारे. स्त्री-सहवास, सौंदर्यासक्ती, सोनं-नाणं, दागिने यापासून लांब राहणारे. तर विष्णू भगवान शेषशायी, लक्ष्मी त्यांच्या पायाशी, सोन्याच्या आभूषणाने लगडलेले. त्यांचे अवतारही तसेच. पण शिवशंकरालाही हिंदू धर्माने तसं विरक्त ठेवलं नाही. त्यांचीही दोन दोन लग्न लावून आपण त्यांना गृहस्थाश्रमात आणण्याचे आटोकाट प्रयत्न केलेले.
हिंदू धर्माचा पिवळा रंग हा विष्णूतत्वाचा रंग. सूर्यकिरणांचा, हळद-भंडाऱ्याचा, सोन्याचा, स्त्री-कांतीचा हा रंग जीवनासक्तीचा रंग आहे. कामशास्त्र, शृंगार, सौंदर्य, लक्ष्मी, पैसा, सोन्याने नटलेले देव अशा गृहस्थाश्रमाची परंपरा जपणारा आणि त्यात रमणारा हिंदू धर्म प्रचंड उत्सवप्रिय होता… आहे. पिवळा हा हिंदूंचा रसरशीत रंग.
लक्षात घ्या लाल निळा आणि पिवळा हे तीन बेसिक रंग. हे आपण शाळेत शिकलेलो.
हिंदुत्वाचा प्रमुख रंग पिवळा. तो कुंकवाच्या लाल रंगात मिसळला की त्याचा भगवा तयार होतो. हाच पिवळा रंग आभाळाच्या निळ्या रंगात मिसळला की हिरवा रंग तयार होतो.
म्हणजे भगवा आणि हिरवा या दोन्ही रंगांमधळा कॉमन रंग आहे पिवळा.
भगवा रंग विरक्तीचा असला तरी तो शैवकालीन नाही. बौद्ध धर्माच्या प्रभावात सर्वप्रथम पिवळ्या रंगात लाल रंगाचा प्रवेश झाला आणि वैराग्याच्या वाटेवरच्या साधकांनी भगवा रंग वापरायला सुरुवात केली.
हिंदू धर्मात जो शरीरधर्माचा उत्सव होता तो बौद्धकाळात विपरीत झाला. भारतीय सभ्येतेत वरच्या भागात वस्त्र लेण्याची पद्धती नव्हती. स्त्रियांचेही एकवस्त्र असायचे. कंबरेच्या वरचे शरीर उघडेच असायचे. बुद्धकाळ व त्यानंतर अब्राहमिक श्रद्धांमधून शरीराबद्दलचे कठोर तर्कट प्रस्थापित झाले. शरीर म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट आहे. शरीर म्हणजे इच्छांचं माहेरघर. इच्छा या वाईटच आहेत याचा मोठा पगडा निर्माण झाला. शरीर अपवित्र, इच्छा अपवित्र असा संस्कार घडला. शरीर हे सैतानाचं घर, पाप त्यातूनच जन्मतं मग हे शरीर सतत झाकलं गेलं पाहिजे. इस्लाम आला त्यासोबत सर्वप्रथम स्त्रियांसाठी घुंघट आला. आणि पुढच्या पवित्र-अपवित्रतेच्या संकल्पना अधिक दृढ होत गेल्या.
या इच्छाच आपल्याला पापी बनवतात. शरीरातूनच वासना आणि इतर भावनांचा उगम होतो. या इच्छांचं दमन करण्यासाठी शरीराचे चोचले थांबवून वैराग्याचे दिशेने वाटचाल करण्याची संकल्पना बौद्ध धर्मात लोकप्रिय झाली. त्या कालखंडातच भगवा रंग हा समर्पण आणि वैराग्याचं प्रतीक म्हणून पुढे आला. गृहस्थाश्रमातून बाहेर पडलेला माणूस भगवी कफनी घालू लागला. सन्यासाश्रमाचं प्रतीक भगवा बनला. पुढे त्यामुळे त्याला पावित्र्य चिकटलं.
शंकराचार्यांनी आठव्या शतकात हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं तेव्हा हा भगवा उत्तर भारतात केसरिया रंग म्हणून समर्पणचा रंग या अर्थाने लोकप्रिय केला.