राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा आपलं डोकं उचलले आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात वाढणाऱ्या रुग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने चांगलीच कंबर कसली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याही डोक्यावरील ताण वाढला आहे. यातच टोपेही कोरोनाशी लढा देत असताना त्यांनी नागरिकांना भावनिक पत्र लिहून आवाहन केले आहे. या पत्रात टोपे यांनी कोरोना योद्ध्यांचे कौतुक केले. त्यासोबतच नागरिकांना येणाऱ्या संकटाची जाणीव करून दिली आहे.
‘गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, जीवाची पर्वा न करता केलेले प्रामाणिक प्रयत्न, अनेक कोरोना योद्धे विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोनावर नियंत्रण आणू शकलो,’ असे म्हणत राजेश टोपे यांनी कोरोना योध्यांचे कौतुक केले आहे. त्यासोबतच पुढील करोना संकटाबद्दलही नागरिकांना आवाहन केलं आहे. अद्याप कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला सामुहिकरित्या याचा मुकाबला करावा लागेल. मी सध्या कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता अखेर त्याने मला गाठलेच. मात्र आपल्या सदभावना,प्रेम यामुळे त्याला हरवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुध्दच्या सामुहिक लढाईत सहभागी होईल,’ अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्याच्या आरोग्यामंत्र्यांनी जनतेला केलं भावनिक आवाहन
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने अनेक ठिकाणी कठोर नियमावली जारी केली आहे. याच अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी लढा देताना रुग्णालयातून राज्यातील नागरिकांना पत्राच्या माध्यमातून आवाहन केले आहे.