बॉलिवूड कलाकार जुही चावलाने मध्यंतरी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका टाकली होती. भारताने 5G लाँच करु नये, ते नागरिकांच्या आरोग्यास, वृक्ष आणि प्राणीमात्रास धोकादायक असल्याचा दावा जुहीने केला होता. नुकतंच अमेरिकेत ५जी लाँच करण्यात आले आहे. त्यानंतर अमेरिकेच्या विमानतळ प्रशासनाची चांगलीच धावपळ होतेय. ५ जी नेटवर्कमुळे विमानातील नॅविगेशन सिस्टिमवर परिणाम होत असल्याचे विमान कंपन्यांचे म्हणणे आहे. भारताच्या एअर इंडियाने अमेरिकेत उतरणारी १९ आणि २० जानेवारीचे सर्व लँडिग पुढे ढकलले आहेत. या सर्व गदारोळात पुन्हा एकदा ५जी नेटवर्कची उपयुक्तता आणि त्याचे परिणामांची चर्चा सुरु झाली आहे.
कोणतेही नवे तंत्रज्ञान जेव्हा येते, तेव्हा त्याबाबत विविध मतं व्यक्त केली जातात. काही लोक शंका उपस्थित करतात, तर काही जण पाठराखण करतात. अमेरिकेच्या बातमीआधी जगभरातील ४० देशांमध्ये ५जी सेवा सुरु आहे, ही बाबही धान्यात घ्यावी लागेल. मात्र फक्त अमेरिकेतच ५जी सेवेचा विमान सेवेवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
Boeing has cleared AI to operate in USA on B777. Accordingly,first flight has left this morning to JFK. Other flights leaving in the day are to Chicago & SFO Arrangements to carry stranded pax are being worked out. Matter regarding B777 flying into USA has been sorted: Air India
— ANI (@ANI) January 20, 2022
युएस एव्हिएशन रेग्युलेटर फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि अमेरिकेतील १० एव्हिएशन कंपन्यांनी ५जी नेटवर्कच्या हस्तक्षेपामुळे विमानाच्या सेवांवर परिणाम होण्याची शंका उपस्थित केली आहे. त्याची कारणे थोडक्यात अशी आहेत की –
– ५जी नेटवर्क हे रेडिओ सिग्नलवर आधारीत आहे. अमेरिकेने मोबाईल कंपन्यासाठी ५जी बँडसाठी मिड-रेंज बँडविथ फ्रिक्वेन्सीचा लिलाव केला होता. हीच फ्रिक्वेन्सी विमानाच्या ऑल्टीमीटर रेडियो सिग्नल रेंजच्या फ्रिक्वेन्सीशी मिळतीजुळती आहे.
– ५जी आणि विमानांची फ्रिक्वेन्सी एकच असल्यामुळे विमानांची सुरक्षितता, त्याचा हवाई प्रवासाचा मार्ग म्हणजेच नेव्हिगेशनला धोका पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
– ५जी ट्रान्समिशनमुळे विमानाच्या ऑल्टीमीटर सारख्या यंत्रावर परिणाम होऊन ऑल्टीमीटरच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे विमानाची लँडिग सुरळीत होण्यास धोका निर्माण होऊ शकतो.
– ऑल्टीमीटरच्या वापरामुळे विमान जमिनीपासून किती उंचीवर आहे, याचा अचूक डेटा मिळतो. तर ऑटोमॅटिक लँडिग करण्यातही त्याचा वापर होतो. त्यामुळे विमानातील महत्त्वाचे टूल म्हणून ऑल्टीमीटरकडे पाहिले जाते.
अमेरिकेत ५जी तंत्रज्ञानानंतर अनेक विमानांची उड्डाणे आणि लँडिग रद्द झाली तर अब्जावधीचे नुकसान होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जवळपास ४० मोठ्या विमानतळावर ऑल्टीमीटरचा वापर करता आला नाही, तर रोज कमीत कमी १००० विमाने रद्द करावी लागतील. याचा तोटा प्रवाशांना तर होईलच, त्याशिवाय अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम दिसेल.
इतर देशामध्ये ५जी चा परिणाम काय होतोय
अमेरिकेत जरी ५जी सेवेमुळे विमान सेवेवर परिणाम होत असला तरी इतर देशांमध्ये मात्र विमानसेवेर याचा काहीही परिणाम दिसलेला नाही. युरोपमधील देशांमध्ये ५जी सेवेमुळे कोणतीही तक्रार पुढे आलेली नाही. अमेरिकेच्या तुलनेत युरोपने कमी फ्रिक्वेन्सीचा वापर केलेला आहे. फ्रांसमध्ये ५जी वापरावर बफर झोन तयार केला आहे. विमानतळ आणि संवेदनशील जागांवर ५जी सिग्नल प्रतिबंधित केले आहेत.
भारतावर ५जी सेवेचा विपरीत परिणाम होईल?
भारतात मुंबईसह १३ मोठ्या शहरांमध्ये ५जी नेटवर्कची ट्रायल सुरु झालेली आहे. मात्र विमानसेवेवर त्याचा काय परिणाम होतो, याबाबत अद्याप अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही. कदाचित फ्रान्सप्रमाणे भारत सरकार देखील विमानतळांच्या परिसरात ५जी सेवा प्रतिबंधित करु शकते.
5G नेटवर्कचा आरोग्यसाठी धोकादायक आहे?
जागतिक आरोग्य संघटनेने ५जीचा आरोग्यवर घातक परिणाम होतो, ही शक्यता फेटाळून लावली आहे. त्यांच्या मतानुसार रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे मानवी शरिराचे फक्त तापमान वाढू शकते आणि तापमान वाढल्याने शरिराच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.