रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ३० जून नंतर रेल्वे प्रवाशांना जनरल टिकीटावर देखील प्रवास करता येणार आहे. गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे रेल्वेने जनरल टिकीट सेवा बंद केली होती. पहिल्या लॉकडाऊन काळात तर संपूर्ण रेल्वे सेवाच ठप्प होती. मात्र त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर कोरोना स्थितीचा आढावा घेऊन काही रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे विभागाकडून विशेष ट्रेन चालवण्यात आल्या. मात्र या सर्व विशेष ट्रेनमध्ये जनरल टिकीटाची सुविधा बंद करण्यात आली होती. केवळ ज्या प्रवाशांचे आरक्षण आहे, तेच प्रवासी रेल्वेने प्रवास करू शकत होते. सोबतच टिकीट काऊंटरवरून ज्यांनी टिकीट काढले आहे पण ते टिकीट कन्फर्म झाले नाही अशा प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची मुभा होती. मात्र आता कोरोनाची लाट ओसरली असून, येत्या ३० जून नंतर रेल्वे प्रवाशांना जनरल टिकीटावर प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते, त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
३० जूननंतर प्रवासाला मुभा
३० जूननंतर फरीदाबाद – बलवल ते दिल्लीदरम्यान तसेच फिरोजपूर, मुरादाबाद, लखनऊ आणि अंबाला छावणी या मार्गावर धावणाऱ्या तब्बल २५६ मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमध्ये जनरल तिकिट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. रेल्वे बोर्डकरून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, त्यानुसार ट्रेनमध्ये काही अत्यावश्यक बदल देखील करण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वे विभागाच्या वतीने उत्तर रेल्वेच्या पाचही विभागांना पत्र लिहून माहिती कळवण्यात आली आहे. तब्बल २५ महिन्यानंतर आता पुन्हा एकदा प्रवाशांना जनरल तिकीटाने प्रवास करता येणार आहे.
या रेल्वेमध्ये मिळणार जनरल टिकिटाची सुविधा
पश्चिम एक्सप्रेस, देहराडून एक्सप्रेस, हरिद्वार – बांद्रा एक्सप्रेस, छत्तीसगढ एक्सप्रेस, कटरा एक्सप्रेस, फरादनगर पास, मालवा एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, दक्षिण एक्सप्रेस, इंदोर इंटरसिटी एक्सप्रेस, अमृतसर इंदोर एक्सप्रेस ,कटरा जबलपूर एक्सप्रेस, उत्कल एक्स्प्रेस, उज्जयिनी एक्स्प्रेस, गोल्डन टेंपल एक्स्प्रेस, ताज एक्सप्रेस.