
टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये अनेक चुरशीचे खेळ संपूर्ण जगाने पाहीले. यात आकर्षणाचा विषय ठरला तो पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेतील अंतिम फेरीचा. पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत इटलीच्या जियानमार्को टँपबेरीचा सामना कतारच्या मुताज एस्सा बार्शीमशी होता. दोघांनी समान उडी म्हणजेच २.३७ मीटर उडी मारली होती. दोघेही बरोबरीवर होते त्यामुळे आता सुवर्ण पदकाचा मान कोणाला जातोय याकडे सर्वांचे नजरा लागल्या होत्या.
ऑलिम्पिक अधिकार्यांनी दोघांनाही आणखी तीन प्रयत्न करण्याची संधी दिली. परंतु पुन्हा २.३७ मीटरपेक्षा जास्त उंची गाठू शकले नाही. त्या दोघांना आणखी एक संधी देण्यात आली, पण पायाच्या गंभीर दुखापतीमुळे टँपबेरीने शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली. त्याच क्षणी बार्शीम समोर दुसरा विरोधक नव्हता, त्यामुळे तो एकटा सुवर्ण पदक सहज पटकावू शकला असता. पण बार्शीमने अधिकाऱ्यांना विचारले “जर मी शेवटच्या प्रयत्नातून माघार घेतली तर ते पदक आमच्या दोघांमध्ये विभागून दिले जाऊ शकते का?” अधिकाऱ्यांनी नियमांची जाचपणी करून हे सुवर्ण पदक दोघांमध्ये विभागून दिले जाईल अशी माहीती दिली.
त्यानंतर बार्शीमला विचार करण्यासारखे काहीच नव्हते, त्याने शेवटच्या प्रयत्नातून माघार घेण्याची घोषणा केली. हे पाहून इटालियन प्रतिस्पर्धी टँपबेरीला आकाश ठेंगण झालं. त्याने धावत जाऊन बार्शीमला मिठी मारली. आपला आनंद व्यक्त करताना तो किंचाळला जोरात ओरडू लागला. प्रेक्षकांना हा क्षण हृदयाला स्पर्श करणारा होता. यातून क्रिडाप्रेमींमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, की खेळांमध्ये प्रेमाचा मोठा वाटा असतो. हे अवर्णनीय क्रीडा कौशल्य प्रकट करते जे धर्म, रंग आणि सीमा या साऱ्याला अप्रासंगिक बनवते. खेळात स्पर्धा जरूर असावी पण ती खेळकर वृत्तीनेच जिंकावी.