स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांच्या हकालपट्टीचा विषय सध्या चांगलाच गाजतोय. किरण माने सोशल मीडियावर सतत सामाजिक, राजकीय विषयांबाबत आपली सडेतोड भूमिका व्यक्त करत असतात. त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र यावेळी त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतूनच बाहेर पडावे लागत आहे. त्यांच्या हकालपट्टीमागे त्यांचे परखडपणे व्यक्त होणं, हेच कारण असल्याचं सांगण्यात येतंय.
किरण माने यांच्या समर्थनार्थ आता सोशल मीडियावर #IStandWith_KiranMane ही मोहीम काही लोकांनी सुरु केलीये. अनेकजण मानेंची बाजू उचलून धरत आहेत. अनेकांनी आता स्टार प्रवाह या वाहिनीवरच बंदी आणावी किंवा ती वाहिनी पाहणं बंद करावं, असा सूर धरला आहे. महाराष्ट्रात एका बाजूला शरद पोंक्षे, विक्रम गोखले आणि सुमित राघवन सारखे कलाकार आपली राजकीय भूमिका परखडपणे मांडत असतात. मात्र त्यांना कधीही कामाच्या ठिकाणी त्यांच्या भूमिकेवरुन आडकाठी करण्यात आली नाही, मग किरण माने यांच्याबरोबरच हा अन्याय का? असा सवाल उपस्थित करत अनेकांनी हा सांस्कृतिक दहशतवाद असल्याचे सांगितले आहे.
सांस्कृतिक दहशतवादासोबतच बहुजन आणि ब्राह्मण असा सुप्त वादही किरण माने यांच्या प्रकरणाला आहे. वरकरणी याचा उल्लेख स्पष्टपणे होत नसला तरी अनेकांकडून हाच विषय उपस्थित होतोय. अभिजन वर्गातील एखाद्या कलाकाराला अशाप्रकारे केंद्र सरकारची भलामन आणि राज्य सरकारच्या विरोधातली भूमिका घेतल्याबद्दल जर एखाद्या कामातून मुक्त व्हावे लागले असते तर? तर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी, तथाकथित साहित्यिक, विचारवंतानी मोठा आकांडतांडव केला असता. मात्र किरण माने बहुजन असल्याकारणाने याला अनुल्लेखाने बाजूला सारण्यात आले आहे.
मुळताच मराठी कलाकार प्रवाहाच्या विरोधात जाऊन सामाजिक भूमिका घेत नाहीत, असा एक जुनाच आरोप आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या असेल, एसटी कामगारांसारखे आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रातील इतर ज्वलंत प्रश्न असतील. मराठी कलाकार कधीही उघडपणे भूमिका घेताना दिसत नाही. याउलट दक्षिणेतील कलाकार त्यांच्या प्रश्नांविषयी, संस्कृतीविषयी जास्त आग्रही आणि प्रसंगी आक्रमक असतात.
देशात नुकतेच झालेले शेतकरी आंदोलनाचे उदाहरण घ्या. परदेशातील रिहानासारखी मोठी कलाकार शेतकरी आंदोलनावर ट्विट करते, मात्र आपल्याकडचे कलाकार त्यावर एक चकारही काढत नाहीत. तामिळनाडूत जलिकट्टूचा मुद्दा ज्वलंत असताना रजनीकांत सारखे मोठे व्यक्तिमत्व त्यावर व्यक्त होतात. पण आपल्याकडे बैल गाडा असेल किंवा इतर खेळांसंबंधी कलाकार कोणतीही भूमिका घेत नाहीत.
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार शरद पोंक्षे, आरोह वेलणकर, विक्रम गोखले, सुमित राघवण हे उघडपणे भाजप आणि केंद्र सरकारधार्जिणी भूमिका घेतात. मात्र त्यांना कधी चित्रपट, नाटक, मालिकेतून काढून टाकले जात नाही. उलट त्यांचा विविध व्यासपिठांवर सत्कार केला जातो. मात्र किरण माने सारखे बहुजन कलाकार सोशल मीडियाद्वारे राजकीय व सामाजिक विषयांवर पोस्ट करतात तर सरळसरळ त्यांना मालिकेतूनच बाहेर काढले जाते.
किरण माने यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोतीराव फुले यांच्या काळातील ब्राह्मण – ब्राह्मणेतर वादाची ठिणगी उडाली आहे. या ठिणगीमुळे सांस्कृतिक दहशतवादाला अग्नी मिळून महाराष्ट्रात पुन्हा सहिष्णू वातावरण निर्माण व्हावे, हीच अपेक्षा.