
आजीबाईंचा मृत्यू झाला म्हणून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले. आजीबाईंची चिताही रचली गेली. शेवटचा विधी पार पडणार तेवढ्यात आजीबाईंची पापणी हलली आणि त्या जिवंत झाल्या. आजीबाईंना स्मशानातून थेट जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. औरंगाबाद येथील कन्नड तालुक्यातील अंधानेरमध्ये ही घटना घडली.
नव्वद वर्षांच्या जिजाबाई वाल्मिक गोरे याचे सोमवारी संध्याकाळी निधन झाले. अंत्यविधीसाठी नातेवाईक जमा झाले, घरी अंत्यसंस्काराचे विधी पार पा़डून आजींचा मृतदेह स्मशानात नेण्यात आला. सरणावर त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला. मृतदेहावर लाकडेही रचण्यात आली. पाणी पाजता येईल एवढाच चेहरा उघडा ठेवला होता. शेवटचा पाणी पाजण्याचा विधी करण्याच्या वेळी आजींची पापणी हलली आणि त्या जिवंत असल्याचे समजले. घडलेला प्रकार पाहून अंत्ययात्रेसाठी जमलेल्या गावकरी आणि नातेवाईकांना आश्चार्याचा धक्का बसला.
काही तासांपूर्वी मृत समजून जिच्यावर आपण अंत्यसस्काराचे विधी पूर्ण केले, ती आजी जिवंत असल्याचे बघून अनेकांना आनंदाचा पाराच उरला नाही. जिजाबाई वाल्मिकी गोरे या सोमवारी संध्याकाळी निपचित पडल्या होत्या. कितीही बोलण्याचा प्रयत्न केला तरी देखील काहीही प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत नव्हता. यामुळे आजीबाईंचा मृत्यू झाल्याचा गैरसमज नातेवाईकांना झाला. आणि त्यांची मृत्यूची माहिती सर्व आप्तस्वकीयांना देण्यात आली. शेकडो नातेवाईकांच्या उपस्थितीत आजीबाईंवरती रुढी परंपरेनुसार सर्व विधी पार पाडले. त्यानंतर आजीबाईंचा मृतदेह तिरडीवर ठेवून स्मशानभूमीत नेण्यात आला.
स्मशानभूमीत आजीबाईंचा मृतदेह सरणावर ठेवला. स्मशानभूमीत सर्व विधी पार पडत होते. शेवटचा विधी म्हणून, पाणी पाजण्यासाठी केवळ चेहरा उघडा ठेवण्यात आला. पाणी पाजण्याच्या वेळी आजीबाईंची पापणी हालली आणि सर्वांना धक्का बसला. यानंतर आजीबाईंचा हात हलल्याचे देखील तेथील उपस्थितांच्या निदर्शनास आले. आजी जिवंत असल्याचे नातेवाईंकांना लक्षात आले. आजींची हालचाल पाहून सर्वांना आनंद झाला. आजीबाईंना नातेवाईकांनी सरणावरून काढून पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. स्मशानात घडलेला हा प्रकार पाहून गावकरी आणि नातेवाईकांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता.