कोरोनाचे थैमान थांबता थांबत नाहीये. राज्यात दर दिवसाला हजारो रुग्ण आढळून येत आहेत. अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या अडचणीवर मार्ग काढला आहे. मुंबई शहरातदेखील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने याकरिता खासगी रुग्णालय व पंचतारांकित हॉटेल यांनी हातमिळवणी केली आहे. आता सौम्य कोरोना रुग्णांना या हॉटेलमध्ये प्रभावी आणि पुरेसे व्यवस्थापन केले जाऊ शकते.
ज्यांची प्रकृती गंभीर नाही, अशा रुग्णांना खासगी रुग्णालयातून हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. मात्र ही प्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांची संमती आवश्यक असणार आहे. आजपासून शहरातील दोन पंचतारांकित हॉटेल्स खासगी रुग्णालयांचा विस्तारित भाग म्हणून कार्यरत होत आहेत. हॉटेल्सना करोना रुग्णांसाठी २० रुमची गरज असून याशिवाय २४ तास डॉक्टर, नर्स, औषधं आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असेल. या सुविधेसाठी रुग्णालय चार हजारांपर्यंतचं शुल्क आकारु शकतात. जर रुग्णासोबत कोणी राहत असेल तर हे शुल्क सहा हजारांपर्यंत आकारण्यात येईल.
करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून रुग्णालयात खाटा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण हवालदिल झाले आहेत. पालिकेच्या डॅशबोर्डनुसार मंगळवारी दुपारी अतिदक्षता विभागात ४५ तर जीवरक्षक प्रणाली सज्ज (व्हेंटिलेटर) केवळ १२ खाटा रिक्त होत्या. त्यामुळे मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण असून खाटा मिळवताना रुग्णांची खूप परवड होत आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सौम्य लक्षण असणारे रुग्ण बेड वापरत असल्याने ज्या रुग्णांना बेड ची गरज आहेत त्यांची ओढाताण होत आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाचा कोरोना रुग्णांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.