कोरोनाशी लढा देऊन आता वर्ष उलटून गेलं आहे. राज्य सरकारने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळोवेळी योग्य निर्णय घेऊन यश मिळविण्याचा प्रयत्न केला. यातच मुंबई शहरातील कोरोनाचा वाढते संक्रमण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर २०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरिही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कठोर आणि मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे खासगी कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच काम करता येणार आहे. या नियमाचे पालन व्हावे यासाठी प्रत्येक वॉर्डात पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.
यापुर्वी रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना प्रशासनाकडून अनेक निर्बंध हटवले गेले. मुंबईचा श्वास असलेली लोकल ट्रेनही सर्वांसाठी खुली केली. मात्र सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला. प्रवासा दरम्यान होणाऱ्या गर्दीत घट करण्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. या नियमाचे काटेकोर पालन होण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये पाच पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून खासगी कार्यालयावर ५० टक्के उपस्थितीवर कटाक्षाने लक्ष ठेवले जाईल. नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी कार्यालयावर कठोर कारवाईचे आदेश पालिकेने दिले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर ७५ दिवसांवर पोहचला आहे. त्यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे.