
पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतर ‘बीएमसीवर भरोसा नाही’ असं बोलून हेटाळणी केली जाते. मात्र वर्षभर बीएमसीचे कर्मचारी मुंबईसाठी कसे राबतात, याकडे अनेकजण डोळेझाक करत असतात. अनेक खडतर परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी मुंबईकरांना सेवा देण्यासाठी आव्हाने झेलत असतात. आता नुकतेच हार्बर रेल्वे मार्गावरील गुरु तेग बहादूर सिंग (जी.टी.बी.) नगर रेल्वे स्थानकाजवळ, रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या ६०० मिलीमिटर जलवाहिनीवरील मोठी गळती वेळीच रोखण्याचे अत्यंत आव्हानात्मक असे काम महानगरपालिकेच्या ‘जल गळती तातडीचा दुरुस्ती विभाग’ने पार पाडले आहे. विशेष म्हणजे रेल्वे मार्ग सुरु असतानाच, रेल्वे वाहतुकीला कोणताही अडसर होऊ न देता जमिनीखाली सुमारे १२ फूट खोलीवर हे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाण्यापासून वाचले, त्यासोबत रेल्वे रुळाखाली भूस्खलन होण्यासारखा संभाव्य धोकादेखील पूर्णपणे टळला आहे. हे लक्षात घेता ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादूर सिंग (जी.टी.बी.) नगर रेल्वे स्थानकाजवळून शीव सर्कल येथे जाणाऱ्या पादचारी पुलाजवळ, रेल्वे रुळाखालून जाणाऱ्या जलवाहिनीवर गळती होत असल्याचा संदेश जल अभियंता विभाग अंतर्गत वरळी स्थित ‘सहाय्यक अभियंता, जलकामे, तातडीचा दुरुस्ती विभाग’ यांना मिळाला. हे काम अत्यंत जोखमीचे तसेच तातडीने करणे आवश्यक होते. कारण, या गळतीचे स्थान नाला व रेल्वे रुळ यामध्ये होते.
या गळतीच्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले की, जेसीबी अथवा कोणत्याही संयंत्राच्या सहाय्याने तेथे खोदकाम केल्यास रुळाखाली भूस्खलन होऊन रुळाला धोका निर्माण होण्याची देखील शक्यता होती. रेल्वेची वाहतूक सुरु असताना जमिनीस हादरे बसतात. त्यामुळे ६०० मिलीमीटर आकाराच्या जल वाहिनीत उतरुन दुरुस्ती करणे अवघड होते. त्यामुळे योग्य निर्णय घेवून, महानगरपालिका प्रशासन तसेच रेल्वे प्रशासनाची आवश्यक परवानगी घेऊन मंगळवार, दिनांक ७ डिसेंबर २०२१ ते सोमवार, दिनांक १३ डिसेंबर २०२१ या कालावधीत, रेल्वे रुळास व रेल्वे वाहतुकीस बाधा येणार नाही, अशारितीने प्रत्यक्ष दुरुस्ती सुरु करण्यात आली.

एफ/उत्तर विभागाच्या सहाय्यक अभियंता (जलकामे) गळती अन्वेषण विभागाने सदर ठिकाणी खोदकाम करुन गळती शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी जलवाहिनी सापडत नसल्याने खोल खड्डा खणावा लागला. जमिनीखाली सुमारे १२ फूट खोल जलवाहिनी आढळली, तेव्हा जलवाहिनीवर सिमेंट कोबा असल्याचे निदर्शनास आले. हा कोबा फोडून जलवाहिनीवरील चौकोनी गाबडा गॅस कटरने कापण्यात आला. मात्र, जलवाहिनीत पाणी असल्याने व आजूबाजूची माती व दगड खड्डयात जात असल्याने शोरिंग प्लेट्स चारही बाजूंनी लावून खड्डा सुरक्षित करुन जलवाहिनीवर मॅनहोल लावण्यात आला. त्याद्वारे सीसीटीव्ही कॅमेरा आत टाकून निरीक्षण केले असता सुमारे ३ मीटर अंतरावर म्हणजेच जवळजवळ रुळाखालीच गळती आढळली.
त्यानंतर, तातडीची दुरुस्ती विभागाचे कुशल कामगार मोतिराम पांचाळ व रामचंद्र वराडकर हे दोघे २४ इंची व्यासाच्या या अरुंद जलवाहिनीत उलट्या दिशेने सरपटत जात गळतीच्या ठिकाणी पोहचले. तेथे जलवाहिनीच्या झेड बेंडची वेल्डींग फाटलेली आढळली व त्यातून गळती होत होती. या गळतीच्या ठिकाणी लाकडी खुंट्या व पाचर अरुंद जागेत बसवून कौशल्यपूर्णरित्या गळती पूर्णपणे बंद करण्यात आली. गळती दुरुस्तीची ही संपूर्ण कार्यवाही अत्यंत आव्हानात्मक होती. जलगळती दुरुस्ती विभागाने हे आव्हान यशस्वीपणे पेलले.
ही गळती तातडीने रोखली गेली नसती तर, गळतीमुळे रेल्वे रुळाखालील जमीन खचण्याचा संभाव्य धोका होता. पाण्याच्या दाबामुळे मोठी गळती होऊन लाखो लीटर्स पाणी वाया गेले असते. तसेच पाणी दूषित होण्याचाही धोका होता. अशा वेळी, अत्यंत जोखमीच्या कामासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर, जल अभियंता संजय आर्ते यांनी जलगळती दुरुस्ती विभागाला हे काम कसे पूर्ण करावे, यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
उप जल अभियंता नंदलाल सभागनी, कार्यकारी अभियंता (परिरक्षण) सुशील चव्हाण, एफ/उत्तर विभागाचे सहाय्यक अभियंता (जलकामे) सोमवंशी यांच्या उपस्थितीत आणि सहाय्यक अभियंता (जलकामे/ तातडीची दुरुस्ती विभाग) जीवन पाटील, दुय्यम अभियंता अमीत हटवार, कनिष्ठ अभियंता वैभव गावडे यांच्या पथकाने प्रत्यक्ष दुरुस्तीची कार्यवाही तडीस नेली. जलगळती तातडीची दुरुस्ती विभागातील कामगारांच्या अविरत प्रयत्नांनी अत्यंत जोखमीचे गळती दुरुस्तीचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्याबद्दल या पथकाचे महानगरपालिका तसेच रेल्वे प्रशासनाकडून कौतुक करण्यात येत आहे.