पोलिसही चक्रावले, मुंब्रा रेतीबंदर परिसरात खळबळ
ठाणे – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरू आहे. या स्कॉर्पियो कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळून आला होता. या प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड घडली असून याच परिसरात आणखी एक मृतदेह आढळून आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. या घडामोडीनंतर मुंब्रा रेतीबंदर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडला असून या मृतदेहाची ओळखही पटली आहे. शेख सलीम अब्दुल मजूर (४८) असे या मृत व्यक्तिचे नाव आहे. शेख सलीम अब्दुल हे रेतीबंदर परिसरात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिस अधिकारी, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.