स्मशान हे बातम्यांचं नवं बिट आहे. काही वाहिन्यांचे रिपोर्टर हल्ली स्मशानात जाऊन लाइव्ह रिपोर्टिंग करतायत. पण इमोशनल बातम्या करताना अभावितपणे अवैज्ञानिक संकेत जाण्याचा धोका आहे.
पहिली गोष्ट म्हणजे डेड बॉडी सार्स कोविड-१९ विषाणू पसरवत नाही. शववाहिनीतून पार्थिव आणून त्यांना अग्नी देणारे पालिकांचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व इतर स्वयंसेवी कार्यकर्ते यांच्या इहलोकविलक्षण कामाचे कौतुक व ऋणनिर्देश करताना ते पार्थिव एखादा व्हायरस बॉम्ब आहे असं चुकूनही वाचक, प्रेक्षक व श्रोत्यांना वाटता कामा नये. त्यामुळे या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मदत करू पाहणाऱ्या नातेवाईकांना अनावश्यक भीती वाटून ते अशा कठीण प्रसंगी दूर राहतात व आपल्या संस्कृतीतले महत्त्वाचे अंतिम संस्काराचे क्रियाकर्म प्रत्यक्षात न आल्याने मनावर एक ओरखडा राहतो व लोक भीतीच्या छायेत राहतात. समाजातून हा फोबिया निघून जाणं आवश्यक आहे.
मृत शरीर श्वासोच्छ्वास करत नसल्यामुळे पार्थिवातील पेशींमध्ये ऑक्सिजनअभावी अनेक जीवशास्त्रीय क्रिया होऊ शकत नाहीत. विस्ताराने व शास्त्रीय पद्धतीने सांगायचं तर विषाणू प्रादुर्भाव होताना सार्स कोविड-१९ विषाणूला जे काटेरी स्पाइक असतात ते आपल्या शरीरातील पेशींच्या एस२ या प्रथिनांशी जोडले जातात. ही रेणू पातळीवरील युती असते. एकदा या प्रथिनांचा संयोग झाला की मग हा व्हायरस आपल्या पेशींचा ताबा घेतो आणि पेशींच्या आतल्या रेणूंची संरचना बदलून ती पेशी उद्ध्वस्त करतो. पेशी फुटताना आतली असंख्य विषाणूची नवी जननक्षम पिलावळ उसळते आणि आसपासच्या पेशींचा ताबा घ्यायला सुरुवात करते. यातले काही हजार संख्येने असलेले कोविड-१९ विषाणू थुंकींच्या तुषारांमधून हवेत नव्या होस्टचा ध्यास घेतात.
कुठल्याही पेशीला जिवंत राहण्यासाठी एडेनोसाइन ट्राय फॉस्फेट नावाचे जैवरासायनिक द्रव्य लागते. पण मनुष्यप्राणी जिवंत राहिला नाही तर ग्लुकोज आणि फॅट्सच्या अभावी हे एटीपी जीवद्रव्य तयार करणं पेशी थांबवते. थोडक्यात पेशी मृत झाल्याने विषाणू त्यांच्या रेणू संरचनेशी खेळ करू शकत नाही. मृत व्यक्ती बोलू, शिंकू, खोकू शकत नाही. त्यामुळे त्या शरीरात जर सार्स कोविड-१९ विषाणू असतील ते बाहेर पडू शकणार नाहीत. थोडक्यात या शास्त्रीय कारणांमुळे मृत शरीर कोरोना पसरवू शकत नाही.
मात्र कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या शरीराशी प्रत्यक्ष स्पर्श टाळावा. अंतिम क्रियाकर्म करताना अंघोळ घातली जाते. मुखात पवित्र धार्मिक वस्तू ठेवल्या जातात. अशावेळी कोविड विषाणूने मृत झालेल्या शरीराच्या मुखातल्या लाळेशी किंवा शरीराच्या रंध्रातून स्रवणाऱ्या द्रवाशी नातेवाईकांचा किंवा शव हाताळणाऱ्याचा संपर्क येऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे बॉडी बॅगमध्ये झाकलेल्या स्थितीतच अंत्यसंस्कार करावे लागतात. अग्नी दिल्यानंतर किंवा विद्युतदाहिनीत विषाणू जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे अस्थिंमधून कोणत्याही प्रकारे विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका नाही. पार्थिवापासून अंतर ठेवा, पण लांब पळून अनादर करू नका.
व्हायरल शेडिंग
साधारणतः एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड कोविड पेशंट विषाणू चाचणीला पॉझिटिव्ह आल्यानंतर योग्य उपचारानंतर त्याच्या शरीरातील सार्स कोविड-१९ विषाणू हा दहाव्या दिवसानंतर संसर्गजन्य राहात नाही. म्हणून आपण अशा पेशंटसाठी क्वारंटाइन कालावधी दहा दिवसांचा करतो. जागतिक स्तरावर सुरक्षिततेचा उपाय म्हणन हा क्वारंटाइन कालावधी १४ दिवसांचा सर्वमान्य आहे. तरीही पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत रुग्णाच्या शरीरात कोविड-१९ विषाणू अधिवास करून असतो आणि त्याची स्वॉब किंवा स्टूल चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. परंतु त्या विषाणूची पेशी संक्रमित करून नवे विषाणू फैलावण्याची क्षमता संपलेली असते.
अतिगंभीर विषाणू प्रादुर्भावाच्या पेशंटच्या शरीरातील विषाणू साधारणतः ८३ दिवस कार्यरत राहू शकतो असं ताजं संशोधन सांगतं. त्यामुळे रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना बरे झाल्यानंतरही साधारणतः तीन महिने काळजी घेण्यास सांगण्यात येते. पण हा अतिगंभीर रुग्णाच्या शरीराच्या सॅम्पलमधला विषाणूही नऊ दिवसांनंतर प्रयोगशाळेत सातत्याने प्रयत्न करूनही जिवंत वेगळा काढणं शास्त्रज्ञांना शक्य झालेलं नाही.