
पाऊस म्हटलं की सुरुवात होते पाणी साचण्याची, मग अचानक येणाऱ्या पावसात आपण आडोसा शोधण्याचे काम करतो. पत्र्याची शेड, दुकान, उड्डाण पुलाच्या खाली असे अनेक पर्याय आपल्याला आहेत. याचप्रमाणे अनेक प्राणीही पावसात आडोसा शोधण्याच्या नादात गाड्यांच्या बॉनेटमध्ये जाऊन बसतात. ही डोकेदुखी वाचवण्यासाठी गाडी सुरु करण्याआधी बॉनेट उघडून चेक करण्याची सवय लावलेली बरी ठरेल. अनुभवी व्यवसायिका संपदा कचरेकर यांच्या गाडीत मांजर अडकल्याचा एक अनुभव आपला महाराष्ट्रशी शेअर केला आहे.
संपदा कचरेकर या रोज दक्षिण मुंबईत गाडी चालवत जातात. काल मात्र एका मांजराच्या पिल्लाने त्यांच्या चालत्या गाडीतून प्रवास केला. गाडीच्या बॉनेटमध्ये मांजरीचं पिल्लू आश्रयाला आलं होतं. गाडी हलू लागल्याने आणि इंजिन गरम झाल्याने पिल्लू ओरडायला लागलं. आसपासच्या गाडीतले लोकही बघायला लागले. संपदा यांना कळेना मांजरीचा आवाज कुठून येतोय. अखेरीस गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून बॉनेट उघडून बघितले तेव्हा पिल्लू अडकलं असल्याचं कळलं. एका इसमाने मग या पिल्लास बाहेर काढलं. ते लगेच तिथून पसार झालं. ही गोष्ट त्यांना रोजच्यापेक्षा काही वेगळीच होती.
अतिवृष्टीमुळे प्राण्यांचे निवारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे हे प्राणी आसऱ्यासाठी वेगवेगळ्या जागा शोधत आहेत. कोरड्या जागेच्या शोधात मांजर, साप यासारखे प्राणी गाड्यांच्या बॉनेटमध्ये जाऊन बसतात. पूरपरिस्थितीत अडकलेल्या वन्यजीवांना वाचविण्यासाठी काही संस्था प्रयत्न करत आहेत. पण आपत्कालीन व्यवस्थापनात प्राण्यांना प्राधान्य मिळत नाही. पण आता यापुढे गाडी सुरू करताना त्यात कुठला प्राणी पाहुणा म्हणून लपून बसला नाही ना, याची खातरजमा करून घ्या.