राज्यात कोरोना महामारीची स्थिती किती गंभीर झाली आहे, हे नाशिकमधील एका घटनेने दिसून येतंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील आरोग्य यंत्रणेतील कमतरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. रुग्णांना वेळेवर बेड मिळत नाहीये. बुधवार दि. ३१ मार्च रोजी बेड मिळत नसल्यामुळे दोन रुग्णांनी थेट नाशिक मनपाच्या बाहेर आंदोलन केले होते. त्यापैकी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा आज (१ एप्रिल) दुर्दैवाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे शहरात खासगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. सिडको भागातील कामटेवाडी येथील ३९ वर्षीय भाऊसाहेब गोळे असे मृत पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यामुळे गोळे यांनी थेट सिलेंडर आणि तोडांला ऑक्सिजन मास्क लावूनच महापालिकेबाहेर आंदोलन केले होते. यानंतर एकच खळबळ उडाली होती. आयुक्त जाधव यांनी यंत्रणा हलवून गोळे यांना मनपाच्या बिटको रुग्णालयात दाखल केले होते. मात्र बेड मिळूनही गोळे यांचा जीव मात्र वाचू शकला नाही.
दरम्यान त्या दोन रुग्णांना महापालिकेबाहेर आंदोलन करायला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक ढोके यांनी दोन रुग्णांना बेड मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलनासाठी बसविले होते. त्यावेळी ढोके यांची ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेव्हल ३६ एवढी दाखवली होती.