राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्यानंतर त्यावर प्रतिबंधात्मक निर्बंध लावून कोरोनाला थोपवण्याची सुरुवात झाली. मात्र हे निर्बंध नेमके कोणाला ? हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. राजकीय पुढारी हे जनतेचे सेवक असले तरी जनतेच्या हितासाठी स्वत:वर निर्बंध लावण्याकडे त्यांचा कानाडोळा झालेला दिसतोय.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 4, 2022
गर्दी टाळ्यासाठी सरकारने केलेले नियम राजकीय पुढारीच पाळताना दिसत नाहीत. राज्यात सर्रास स्थानिक पुढारी आपल्या विभागातील अनेक सार्वजनिक, सामाजिक, लग्न सोहळ्यांना उपस्थिती लावतात. मात्र यातून होणारा कोरोनाचा प्रसार किती धोकादायक ठरू शकतो याची कल्पना कोणीही करताना दिसत नाही.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!
— Arvind Sawant (@AGSawant) January 4, 2022
राजकीय नेते हे अनेक लोकहिताची कामे करतात यात दुमत नाही. मात्र सध्या सुरू असलेली परिस्थितीचा आढावा घेतला तर कोणाचा पक्षप्रवेश असो वा लग्न, राजकीय पुढाऱ्यांसाठी सर्वकाही माफ असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. अशाच काहीशा कार्यक्रमातून गर्दी झाल्यानंतर त्यात राज्यातील १० मंत्री आणि २० आमदार संक्रमित झाल्याची माहीती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल +ve आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या दोन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 4, 2022
यातच आता माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार अरविंद सावंत, आमदार अतुल भातखळकर, आमदार रोहीत पवार यांचीही भर पडल्याचे समजते. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याची माहीती जनतेला दिली. मात्र दुर्दैवाने या संक्रमाणाचा फटका त्यांनी उपस्थिती लावलेल्या कार्यक्रमातील लोकांनाही बसू शकतो. यातूनच रुग्णसंख्येत वाढ होताना आपल्याला दिसते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2022
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येचा लग्नसोहळा अगदी धुमधड्यात पार पडला. या लग्नसोहळ्याला राज्यातील अनेक मंत्री, आमदार आणि नामांकित व्यक्तींची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर खुद्द हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी कोरोनाबाधित झाले.
यादरम्यान राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. इतकेच नाही तर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही आपल्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहताना कोरोना निर्बंधांचा विसर पडल्याचे दिसले आहे. स्टेजवर गर्दी असतानाही त्यांनी मास्क काढून ठेवला. त्यामुळे कोरोना निर्बंध हे केवळ सामान्य जनतेसाठी असतात का? राजकीय पुढाऱ्यांना याचे गांभीर्य कधी कळणार हा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे.