Home ताज्या बातम्या सायकलिंग, तरूणाई आणि दृष्टीकोन

सायकलिंग, तरूणाई आणि दृष्टीकोन

576
0

निरोगी राहण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत व्यायाम महत्त्वाचा असतो. यासाठी जॉगिंग, स्विमिंग, जिम अशा विविध पर्यायांचा अवलंब केला जातो. याबरोबरच भारतात आता सायकलिंगला प्राधान्य दिलं जाऊ लागलंय. आज जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने ‘आपला महाराष्ट्र’ने स्वस्त आणि मस्त असा हा सायकलिंगचा आरोग्यमंत्र लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी ज्येष्ठ सायकलपटू व गिर्यारोहक सतीश आंबेरकर यांच्याशी बातचित केली. सायकलवर जगाची सफर करणाऱ्या या सायकलपटूशी झालेला संवाद…

 

 

 

प्रश्न:- सायकलिंग क्षेत्राकडे आपण कसे वळलात?

उत्तर :- गिर्यारोहण क्षेत्रात माझा प्रवास सुरू असताना या क्षेत्रासाठी लागणारी शारीरिक कमी भरून काढण्यासाठी सायकलिंगचा पर्याय मी सर्वप्रथम स्वीकारला. सर्वप्रथम १९८६ साली काही सहकाऱ्यांसह मुंबई ते लडाख ही सायकल मोहीम आखून भारतातील पहिल्या सायकल मोहीमेला आरंभ केला. ही सायकलिंग क्षेत्रातील सुरूवात म्हणू शकतो. त्यानंतर सतत या प्रवासाला गती देण्याचे काम केले. १९८९-९० या वर्षात ३२० दिवसात २४ देशांची यशस्वी जागतिक सायकल भ्रमंती पूर्ण केली.

 

प्रश्न :- या सायकल प्रवासात आलेले काही अनुभव?

उत्तर :- सायकल भ्रमंती करताना आलेले अनुभव विलक्षण होते. साधारणतः अशा सायकल प्रवासाची सुरूवात पश्चिमेकडून पूर्वेकडे करण्याचा प्रघात होता. मात्र आम्ही पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा खर्च आणि प्रवासाच्या दृष्टीने झाला.

 

प्रश्न :- भारतात सायकलिंग व्यायामप्रकार म्हणून प्रचलित आहे असे वाटते का?

उत्तर :- भारत देशात सायकल या वाहनाला फारसे महत्त्व नाही. काही दशकांपूर्वी पुणे शहरात सायकली मोठ्या प्रमाणात चालवल्या जात. पण नंतर भारतात सायकलचा प्रसार व प्रचार झाला नसल्याची प्रचिती आम्हाला आमच्या सायकल मोहिमेत आली. पण हल्लीच्या काळात आणि कोरोनाच्या या जागतिक महामारीत लोकांचा आरोग्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मुख्यत्वेकरून तरूणांचा सायकलकडे ओढा वाढला आहे. आपली प्रतिकारशक्ती व शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी लोक सायकलिंग करु लागले आहेत. हा बदल जाणवतो आहे.

 

प्रश्न :- सध्या अनेक प्रकारच्या सायकली बाजारात उपलब्ध आहेत. सायकलिंगसाठी कोणती सायकल घ्यावी याबद्दल तुम्ही काय सांगाल?

उत्तर :- सध्या देशात सायकल्सची मागणी वाढली आहे, तसेच अनेक पर्यायही आले आहेत. सुरुवातीला सायकलमध्ये गिअर ही संकल्पना नव्हती, आता सायकलच्या रचनेत अत्याधुनिक बदल झाले आहेत. उत्तमोत्तम सायकल्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र रोजच्या व्यायामासाठी महागड्या सायकल्सची आवश्यकता नाही. आजकाल सायकलच्या ट्रेंडमध्ये चढाओढ पाहायला मिळते. मात्र लोकांनी सायकल घेताना किंमतीकडे न पहाता आपला उद्देश डोळ्यांपुढे ठेवावा. सायकलच्या किंमतीपेक्षा प्रवासाची सुरुवात केल्यावर येणारा अनुभव हा लाखमोलाचा असतो.

 

प्रश्न :- आपल्या इथे सायकलिंगसाठी पोषक वातावरण असल्याचे वाटते का?

उत्तर :- सध्या अनेक टूर कंपन्या ‘नाईट सायकलिंग’ ही संकल्पना राबवत आहेत. मुंबईसारख्या शहरात रात्रीच्या वेळी अनेक ग्रुप गेट वे ऑफ इंडिया ते अंधेरी, गेट वे ऑफ इंडिया ते बदलापूर, गोरेगाव-आरे कॉलनी असा प्रवास करतात. ही संकल्पना छान आहे, मात्र यात सुसूत्रता येणे गरजेचे आहे. मला अमेरिकेतील उदाहरणे आठवतात. अमेरिकेत एका कुरिअर कंपनीचे डिलीव्हरी बॉईज हे सायकलिस्ट आहेत. त्याठिकाणी सर्वात जलद वाहन म्हणून सायकलकडे पाहिले जाते. वाढत्या शहरीकरणात ट्रॅफिकमध्ये गाडी वेगात जाऊ शकत नाही. त्याठिकाणी गर्दीची वेळ सोडता लोकांना सायकल मेट्रोने घेऊन जाण्यासदेखील परवानगी आहे. यातून लांबचा पल्लाही सायकलने गाठता येऊ शकतो. असे बदल आपल्या देशातही झाले तर सायकलिंगला देशात अधिक गती मिळू शकेल.

 

 

 

प्रश्न :- सायकलिंगला तरुणाईची वाढती पसंती वाढते आहे. या तरूणांना आज जागतिक सायकल दिनानिमित्त तुम्ही कोणता संदेश द्याल?

उत्तर :- साकलिंगसाठी सातत्य महत्त्वाचे आहे. यासाठी अनेक सोसायट्यांमध्ये आपली सायकल कशी सांभाळावी, तिची देखभाल, स्टॅमिना वाढविण्याचे नियोजन याबाबत मी जागृती करतो. अनेजण सायकल हौसेने खरेदी करतात, मात्र कालांतराने ती पार्किंगमध्ये पडून राहते. अशा सायकल मग खराब होतात. या सायकल रिपेअर करून आदिवासी पाड्यांमधील मुलांना वा गरजवंतांना दिल्या तर त्याद्वारे सामाजिक बांधिलकीही जपली जाऊ शकते. या गोष्टीची जाणीव लोकांना होण्याची गरज आहे. सायकलिंग या विषयात मोठं गूढ लपलं आहे. सायकलिंग करताना आपला स्वतःशी संवाद होऊ शकतो. ज्यावेळी आपण सोलो सायकलिंग करतो तेव्हा आपल्यासोबत सायकलव्यतिरिक्त कोणीही नसतं. यातून आपला आत्मविश्वास वाढतो तसेच आणि स्व-संवादाला वेळ मिळतो. दुसरीकडे समूहासोबत सायकलिंग करताना सोबत्यांच्या स्वभावाशी आपला अधिक चांगला परिचय होतो. सायकल भ्रमंती करताना प्रवास वाढतो, अनेक चांगले-वाईट अनुभव येतात, यातून आपण माणसं वाचायला शिकतो. नियमित सायकलिंग करणाऱ्या अनेकांवर सायकलिंगचा इतका प्रभाव होतो की त्या व्यक्तींचा कल हा व्यसनाकडे किंवा वायफळ खर्चाकडे न जाता बचतीकडे आणि अधिक सकारात्मक दृष्टीने आयुष्य बघण्याकडे असतो. सायकलिंगचा हा मोठा फायदा म्हणावा लागेल.

Previous articleसेक्सटॉर्शन; आंबटशौकिंनाना लुटण्याचा नवा फंडा
Next article‘केजीएफ’ स्टार यश करणार कन्नड चित्रपटसृष्टीतील ३००० कर्मचाऱ्यांना मदत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here