युक्रेन मध्ये रशियाद्वारे सातत्याने बॉम्बवर्षाव होत आहे, मिसाईल्स सोडल्या जात आहेत. युक्रेन मध्ये हळूहळू परिस्थिती फार गंभीर होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून युक्रेनचं मेडिकल शिक्षण चर्चेत आलंय. तिथं शिक्षण घेण्यासाठी काय करावं लागतं यापासून ते कमी मार्क असलेलेच तिथं जातात का याचीही चर्चा होतेय. त्यातच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्यानं चांगलाच वाद झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर विविधांगी चर्चा होतेय. आता त्यातच युक्रेनमध्ये रशियन गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या नवीन शेखरप्पाच्या वडिलांनी वास्तव सांगितलंय. ते मात्र सरकारच नाही तर सर्वांचेच डोळे उघडणारं आहे.
काय म्हणालेत नवीन शेखरप्पाचे वडील?
नवीन शेखरप्पा हा मूळचा कर्नाटकचा पण त्याचा युक्रेनमध्ये गोळीबारात मृत्यू झालाय. तो रेशन आणण्यासाठी बाहेर पडलेला असताना रशियन सैन्याच्या गोळीबारात त्याला जीव गमवावा लागला. तो नेमका कशासाठी युक्रेनला गेला होता, त्याला किती मार्कस इथं होते याचा शोध सुरु झाला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता नवीन शेखरप्पाच्या वडिलांनी वास्तव सांगितलं. ते म्हणाले, बारावीला ९७ टक्के मिळूनही माझ्या मुलाला राज्यात मेडीकलची सीट मिळू शकली नाही. इथं मेडीकलची सीट मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये द्यावे लागतात पण त्यापेक्षा कमी पैशात विदेशात तेच शिक्षण मिळतंय.
काय म्हणाले होते केंद्रीय मंत्री जोशी?
प्रल्हाद जोशी हे कर्नाटकच्याच धारवाडचे खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्रीही. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले होते की, ९० टक्के विद्यार्थी जे युक्रेन किंवा विदेशात मेडिकलच्या शिक्षणासाठी जातात, ते आपल्या देशातल्या परिक्षेत क्वालिफायही होऊ शकत नाहीत. प्रल्हाद जोशींच्या ह्या वक्तव्यावर आणि विशेषत: त्याच्या टायमिंग देशभर टिका केली जातेय. कारण यूक्रेनमध्ये जवळपास २० हजार भारतीय अडकले, ज्यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्यांना वेळीच परत आणण्यात केंद्र सरकारला अपयश आल्याची टीका होतेय. त्या पार्श्वभूमीवर जोशींचं वक्तव्यानं संताप निर्माण झाला. पण नवीन शेखरप्पाच्या वडीलांच्या वक्तव्यानं सरकारला विचार करायलाही भाग पाडलं आहे. कारण नवीनला ९७ टक्के होते आणि तरीही त्याला मेडिकलची सीट मिळाली नव्हती. परिणामी त्याला मायदेश सोडून युक्रेनला जावं लागलं आणि तिथल्या युद्धात त्याचा मृत्यू झाला.