कोरोनाची महामारी सुरु झाल्यापासून भारतात आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याची माहिती एका आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालातून पुढे आली आहे. याकाळात गरिबांच्या उत्पन्नात घट झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला अब्जाधीशांची संख्या लक्षणीय पद्धतीने वाढली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत अब्जाधीशांची संख्या १०२ वरुन १४२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या अब्जाधीशांकडे देशातील गरिबांपेक्षा ४० टक्क्यांहून अधिकची संपत्ती एकवटली आहे. तर २०२१ साली देशातील ८४ टक्के कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले आहे.
जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक शिखर परिषदेच्या आधी ऑक्सफाम (Oxfam) संस्थेने आपला अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये अब्जाधीशांची संख्या १०२ वरुन वाढून १४२ झाली आहे. या काळात या अब्जाधीशांची संपत्ती ७२० बिलियन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. भारतातील ४० टक्के गरिबांपेक्षा ही संपत्ती जास्त आहे.
कोरोनामुळे गरिबांचे उत्पन्न कमी झाले
कोरोनामुळे २०२० आणि २०२१ या वर्षांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसाठी दोन मोठे लॉकडाऊन लावण्यात आले होते. कोरोनामुळे देशभरात लाखो मृत्यू झाले. याकाळात अनेक लोक बेरोजगार झाले, छोटे उद्योग बंद पडले, अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. या दोन्ही वर्षात भारतातील ८४ टक्के कुटुंबाचे उत्पन्न कमी झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अमेरिका, चीननंतर भारतात सर्वाधिक अब्जाधीश
कोरोनाकाळात अब्जाधीश वाढल्यामुळे भारत आता अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर पोहोचला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारतात सर्वाधिक अब्जाधीश आहेत. फ्रांस, स्वीडन आणि स्विर्त्झलँड या देशात मिळून जेवढे अब्जाधीश आहेत, तेवढे एकट्या भारतात आहेत.