भारतात १ मार्च पासून सर्वसामान्यांना लस देण्याचा दुसरा टप्पा सुरु झाला. मागच्या २० दिवसांत लाखो लोकांनी लसीचा पहिला डोज घेतला. अनेक लोकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह दिसून येत आहे. मात्र अजूनही काही लोक लस घेण्यावरुन साशंक आहेत. काही लोकांना लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न आहे. तर ज्या लोकांना आधीच कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी लस घ्यायला हवी का? यावरही समाजात अनेक चर्चा होत आहेत.
नुकत्याच एका वैद्यकीय सर्वेक्षणानुसार ही बाब पुढे आली आहे की, ज्यांना कोरोनाचे संक्रमण होऊन गेले आहे. त्यांनी देखील लस घेणे गरजेचे आहे. तरुण असो वा वयोवृद्ध कोरोना विषाणूला कुणीही बळी पडू शकतो. त्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणात ज्या वयोगटांना लसीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी लस घ्यायलाच हवी, असा मतप्रवाह पुढे येत आहे.
मेडिकल जर्नल ‘द लँसेट’ (The Lancet Journals) मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार असे सांगण्यात आले आहे की, ज्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, त्यांनी देखील लस घेणे गरजेचे आहे. या संशोधनात जवळपास ४० लाख लोकांचा अभ्यास करण्यात आला. ज्या लोकांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांच्यापैकी ८० टक्के लोकांना कोरोनाच्या विरुद्धची सुरक्षा मिळते. तेच ६५ हून अधिक वयाच्या लोकांमध्ये ४७ टक्के सरंक्षण मिळते. म्हणजेच ६५ हून अधिक वय असणाऱ्यांना कोरोनाचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढलेला असतो. त्यामुळेच कोरोना संक्रमण होऊन गेले असेल तरी लस घेणे आवश्यक असल्याचे द लँसेट जर्नलचे म्हणणे आहे.