रणजित डिसले. डिसेंबर २०२० मध्ये अचानकच हे नाव सर्वांच्या तोंडून ऐकून येत होतं. अर्थात या नावाने किमयाच तशी साधली होती. युनेस्को व लंडनमधील वार्की फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार हा रणजित डिसले यांना मिळाला होता. जगभरातील १४० देशांमधून १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून डिसले गुरुजींची निवड करण्यात आली होती.
मात्र सध्या रणजित डिसले यांना एका वेगळ्याच समस्येला तोंड दयावे लागत आहे. रणजित डिसले यांना अमेरिकन सरकारकडून शिक्षकांसाठी दिली जाणारी फुल प्रेस स्कॉलरशिप प्राप्त झाली असून त्याअंतर्गत त्यांना ऑगस्ट २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत अमेरिकेत जाऊन पिस इन एज्युकेशन या विषयावर अधिक सखोल संशोधन करण्याची संधी मिळत आहे. मात्र या कोर्ससाठी त्यांना अमेरिकेला जायला शिक्षणअधिकाऱ्यांकडून सुट्टी मंजूर होत नाही आहे. डिसले गुरुजींचा सुट्टीचा अर्ज गेल्या दीड महिन्यांपासून अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून असल्याची माहिती समोर येत आहेत.
शिक्षणाधिकाऱ्यांकडून नियमांवर बोट
सदर प्रकरणासंदर्भात प्रसारमाध्यमांकडून शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी नियमावलीकडे बोट दाखवले. डिसले गुरुजी काल जिल्हा परिषदेत आले होते. ते आल्यानंतर समजलं की ते अमेरिकेतील विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी जात आहेत. परंतु परदेशात शिक्षण घेण्यापूर्वी किंवा सेवेमध्ये असताना शिक्षण घेण्यासाठी आपल्याला एखाद्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी एक प्रक्रिया आहे ती पार पाडायला हवी. शाळेतील मुख्याध्यापकाकडे त्यांनी अर्ज करायला हवा. त्या अर्जावर तो किती दिवसांचा कोर्स आहे? कोणत्या विद्यापीठात तो ते करणार आहेत? त्या विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्टसमध्ये काय लिहीलं आहे? हे व्यवस्थित लिहून तो अर्ज त्यांनी मुख्याध्यापकामार्फत गटशिक्षण अधिकाऱ्याकडे सादर केल्यानंतर तो अर्ज गटशिक्षणाधिकाऱ्यामार्फत शिक्षणाधिकारी आणि तिथून तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो मान्यतेसाठी जातो. काल ते परस्पर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले असता तेथून त्यांना माझ्याकडे पाठवण्यात आलं. त्यांनी दोन पत्र तयार करुन आणले होते. परंतु कुठलीही परवानगी न घेता ते त्या पत्रावर सही घेण्याच्या प्रयत्नात होते. अश्या प्रकारचं बेशिस्त वर्तन कार्यालयाकडून चालू दिलं जाणार नाही. असं संबंधित शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले.
रणजित डिसलेंच म्हणणं काय?
मी प्रशासनाकडे या स्कॉलरशिपसाठी अध्ययन रजेचा अर्ज केला होता. मला अपेक्षित होतं की त्या अर्जावर मला काहीतरी निर्णय मिळेल. त्यासाठी मी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांच्या निकषानुसार पुढील कोणताही आदेश आलेला नाही. माझ्यापर्यंत अद्याप कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कुठलेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत.
रणजित डिसलेंची सध्याची मन:स्थिती ही फार नैराश्यपूर्ण असून ते आपल्या नोकरीचा राजीनामा देण्याच्याही तयारीत आहेत.
आता या सर्व प्रकरणावर नेमका काय तोडगा निघतो? शिक्षणाधिकारी डिसलेंना सुट्टी मंजूर करतात का? का अमेरिकेत जाण्यासाठी डिसलेंना आपल्या नोकरीवर पाणी सोडावं लागेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.