जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम हा जगभरातील बाजारपेठेवर होत असून सोन्याच्या किंमतीतही मोठी चढ-उतार होत आहे. दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये १२०० रुपयांची वाढ झाली आहे. येत्या काही दिवसात सोन्याचा भाव हा ६० हजारांच्या वर जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत आज एकाच दिवसात १२०२ रुपयांची वाढ झाली असून दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही ५१,८८९ वर पोहोचली आहे. तर चांदीच्या किंमतीतही २१४८ रुपयांची वाढ झाली असून एक किलो ग्रॅम चांदीसाठी ६७,९५६ रुपये मोजावे लागत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत घसरण
आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार करता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येतंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर दहा ग्रॅम सोन्याची किंमत १,९४३ डॉलरवर पोहोचली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला
रशिया-युक्रेनच्या वादाचा परिणाम रुपयाच्या किंमतीवर झाला आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत झाला असून रुपयाची किंमत ४९ पैशांनी घसरली आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ही ७५.८२ इतकी झाली आहे.
सोन्याची किंमत ६० हजारांच्या वर जाणार
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी चढ-उतार होत असल्याचं दिसून येतंय. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. अनेकजण शेअर मार्केटमधून आपली गुंतवणूक काढून ती सोन्यामध्ये करत आहेत. त्यामुळे येत्या काळात सोनं ६० हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.