कोरोना लस आणि त्याचा राज्यात होणारा तुटवडा हा विषय फार गंभीर होत आहे. मात्र यात राजकारण न करता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना एका पत्राद्वारे कोरोना लसीचे उत्पादन महाराष्ट्रात सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. राज्यातील हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.
यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले. त्यामुळे राज्यात लसीकरण मोहिमेला खंड पडला असताना या निर्णयाने ठाकरे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यातून लसीकरण मोहिमेला योग्य गती प्राप्त होऊ शकेल.