मुंबईसह राज्यात होळी पूर्वीच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने वर आहे. येत्या दोन दिवसात मुंबईसह कोकणातील किनाऱ्याजवळील जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
या दरम्यान मुंबईचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उत्तर पश्चिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यामुळे समुद्रावरून वाहणारे वारे वाहण्यास उशीर होत आहे. तसेच आकाश निरभ्र आहे. हवामानाची ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी , सिंधुदूर्ग या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे.अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली.
मागील दोन दिवसापासून मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्यात लागत आहे. मुंबईकर गरमीने हैराण झाले आहेत. येत्या दोन दिवसात उन्हाचा पारा आणखी तीव्र होणार असून मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी. शक्यतो उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. दोन दिवसांवर कमाल तापमानात हळूहळू घट होईल.