भारतीय हवामान विभागाने एकूण पाच राज्यांमध्ये उन्हाचा प्रकोप आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला गेला आहे. ज्यात तापमान आणखी दोन सेल्सिअसने वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार, ईशान्य व मध्य भारतात येत्या पाच दिवसांसाठी तर पूर्व भारतात तीन दिवसांसाठी उन्हाचा पारा वाढणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सरासरी ३५ ते ४० सेल्सिअस अंश इतके तापमान दिसून येत असून त्यात जर आणखी दोन अंश सेल्सिअसची वाढ झाली तर उन्हाची काहिली नागरिकांचे घराबाहेर पडणेही मुश्कील करणार आहे.
लहान मुलांची व वृद्ध नागरिकांची काळजी घ्या
लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींची याकाळात जास्त काळजी घ्यावी, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. कारण उष्माघाताचा त्रास होऊन वेळप्रसंगी मृत्यूदेखील उद्भवू शकतो.
प्रखर उन्हापासून वाचण्यासाठी करा हे उपाय
उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी फिकट रंगाचे व सूती कपडे घालावेत. टोपी आणि छत्रीचा वापर करून डोक्याचे संरक्षण करावे. जास्त वेळ उन्हात राहणाऱ्या व परिश्रमाची कामे करणाऱ्या लोकांना उन्हाचा त्रास सर्वाधिक होतो. त्यामुळे शक्यतो सर्वांनी सावलीत राहण्याचा प्रयत्न करावा.
उष्णतेची लाट येण्याची घोषणा केव्हा केली जाते
रेकॉर्ड केलेल्या तापमानाच्या आधारे जेव्हा एखाद्या क्षेत्राचे तापमान ४५ सेल्सिअसपेक्षा अधिक असते, तेव्हा उष्णता लहर येण्याची घोषणा केली जाते. जेव्हा तापमान ४७ सेल्सिअसपेक्षा जास्त होते तेव्हा तीव्र उष्मालहरीची घोषणा केली जाते. तसेच हवामान विभागाकडून चार रंगांचा आधार घेऊन धोका निर्देशित केला जातो. ज्यात हिरवा (घाबरण्याचे कारण नाही), पिवळा(लक्ष ठेवून माहिती घेत रहा), केशरी (धोक्यासाठी तयार रहा) आणि लाल (धोक्यापासून स्वत:चा बचाव करा) या रंगांचा समावेश आहे.