कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताची जगभर नाचक्की झाली. लस पुरवताना केंद्राच्या नाकी नऊ आले. मग परदेशी लस आयात करण्याची चर्चा सुरू झाली. भारतात चाचणी होऊन मान्यता मिळत नाही, तोपर्यंत परदेशी लस आयात करता येत नव्हती. अखेर डीसीजीआय म्हणजेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (Drugs Controller General of India) चाचणीचे बंधन उठवले. आता विनाचाचणी फायजर आणि मॉर्डना लशी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला.
डीसीजीआयचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी फायजर आणि मॉर्डना कंपनीच्या लशींना जी ब्रिजिंग ट्रायल्सची अट होती, ती अट रद्द केली. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, अमेरिका, जपान, युरोप आणि जागतिक आरोग्य संघटनेने ज्या लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे, त्या लशींच्या भारतात वेगळ्या चाचण्या होणार नाहीत.
ब्रिजिंग ट्रायल्स म्हणजे काय?
एखादे परदेशी औषध किंवा लस जर दुसऱ्या देशात वापरायची असेल तर तिथल्या लोकांवर चाचणी केली जाते. आधी वापरात असलेल्या देशातील आणि नव्या प्रयोगातील निकालाची आकडेवारी पडताळली जाते. या सर्व प्रक्रियेत एखादी लस किंवा औषध संबंधित देशातील नागरिकांसाठी किती सुरक्षित आहे, यांचा अंदाज बांधला जातो. कोविशील्ड आणि स्पुतनिक व्ही या लशींना भारतात मंजुरी देण्याआधी त्याच्या ब्रिजिंग ट्रायल्स झालेल्या आहेत. भारतात लसीकरणाच्या वाढत्या मागणीचा दबाव, त्यातच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवर ओढलेले ताशेरे यामुळे कदाचित सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असावा. कारण ब्रिजिंग ट्रायल्ससाठी काही काळ लागण्याची शक्यता होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रति दिवस एक कोटी लोकांचे लसीकरण करून डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. हे लक्ष्य आता पूर्ण करता येईल.
डीसीजीआयने काढलेल्या नोटीशीत सांगितले आहे की, दोन्ही लशींचा वापर आधी १०० लोकांवर केला जाईल. त्यानंतर सात दिवस त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यात येईल. त्यातून लस सुरक्षित आहे का, हे पाहिल्यावर मग मोठ्या प्रमाणावरच्या लसीकरणाला सुरुवात होईल.
परदेशी लशींच्या किमती अवाक्याबाहेर
भारतात सध्या देण्यात येणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन केंद्र सरकारकडून मोफत देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोविशील्ड लस ६०० ते ९०० रुपयांना मिळत आहे. तर कोव्हॅक्सिन लस १२५० पर्यंत मिळत असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. रशियाची स्पुतनिक लस ९९५ रुपयांपर्यंत असेल असे डॉ. रेड्डी लॅबने आधीच जाहीर केले आहे. आता नव्याने येऊ घातलेली फायझर-बायोएनटेक लस १९.५० डॉलर म्हणजेच
जवळपास १४०० ते १५०० रुपयांपर्यंत असू शकते. तर मॉर्डना लस ३२ ते ३७ डॉलरपर्यंत म्हणजे प्रतिलस २५०० च्या आसपास असण्याची शक्यता आहे.
स्टोरेजची अडचण
फायजर लशीला मायनस ७० अंश सेल्सियस तापमानात ठेवावे लागणार आहे. तर मॉर्डना लशीला मायनस २० अंश सेल्सियस तापमानात ठेवावे लागते. तेच कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशींना २ ते ८ अंश सेल्सियसच्या तापमानात ठेवावे लागते. म्हणजे हे नॉर्मल फ्रिजचे तापमान आहे. भारतात अनेक ठिकाणी याच तापमानात लशींचा साठा ठेवण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यात परदेशी लशींना मायनस तापमानात ठेवण्याचे मोठेच आव्हान आहे. याचाच अर्थ या लशी खासगी रुग्णालयात अधिक प्रमाणात येतील ज्यासाठी भारतीय नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे.
लस लवकरात लवकर मिळावी, ही जनभावना जरी योग्य असली तरी ट्रायल्स न करता लस देणे हे कितपत योग्य आहे, याचे उत्तर सध्यातरी कुणीही देऊ शकणार नाही. प्रत्यक्षात लसीकरण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासू मंडळी याबद्दल निश्चित ठोकताळे आपल्या समोर मांडतीलच. मात्र लशींच्या आयातीसाठी भारताला मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतील. काही प्रमाणात अनुदान द्यावे लागेल. जर असे केले नाही आणि त्यावर जीएसटी सारखे कर लावले तर खासगी रुग्णालयात प्रत्यक्ष किंमतीपेक्षा अधिक महाग दराने या लशी विकल्या जाऊ शकतात.