शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर असलेल्या अनेक जीवांचा अजूनही उलगडा लागलेला नाही. मात्र इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनात मोठे यश हाती आले आहे. इच्छियोसॉर हा १८ करोड वर्षांपूर्वीचा समुद्री जीव इंग्लंडमध्ये सापडला आहे. ब्रिटन येथे सापडलेला हा समुद्री जिवाश्म पालीची प्रजात आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. मागील वर्षी रुटलँड वाईल्डलाईफ ट्रस्ट कन्जरवेशनचे टीम लीडर जो डेविस यांना या जिवाश्माचे अवशेष सापडले होते. वैज्ञानिक डॉ.मार्क इवांस यांनी दिलेल्या माहीतीनुसार या जिवाश्माचे अवशेष हे टेमनोडोंटोसॉरस ट्राइगोनोडॉन या इच्थियोसॉर प्रजातीशी संबंधित आहेत.
या जिवाश्माची नाकापासून शेपटीपर्यंत सरासरी लांबी ही ३३ फुट इतकी आहे. या जीवाचा डोक्याचा भाग केवळ साडेसहा फुटाचा आहे. तसेच या जीवाश्माचे वजन हे सरासरी एक टन इतके आहे. तर जिवंतपणी या जीवाची सरासरी वजन हे तीन टन इतके असू शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे. डॉल्फिन आणि व्हेल माशासारखा या जीवाचा आकार आहे. हे संशोधनाचे काम फार कठीण होते. ज्याचे नेतृत्व डॉ.डीन लोमैक्स यांनी केले आहे. त्यांच्या टिमकडून हा जिवाश्म अवशेष यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला. यासाठी जवळपास १४ दिवस खनन प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने मोठी यंत्रणा लावण्यात आली होती. वातावरणापासून या अवशेषाचा बचाव करण्यात आला तसेच फोटोग्रामेट्री पद्धतीने या जीवाचे मॉडेलही तयार करण्यात आले आहे.
या आधीही इच्थियोसॉर (Ichthyosaur) या जातीचा पहीला शोध हा संशोधक मैरी एनिंग यांनी १९ व्या शतकात लावला होता. जो जीव २५ करोड वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. अशाप्रकारचे संशोधन पुन्हा झाले असून त्यातून मिळालेला ठेवा हा उभारत्या संशोधकांना आणि इतिहासप्रेमींना समाधान देणारा आहे.