Home ताज्या बातम्या २४ वर्षांपासून भारतात अडकलेल्या आफ्रिकन हत्तीला स्वगृही पाठविण्यासाठी प्राणीमित्रांची मोहीम

२४ वर्षांपासून भारतात अडकलेल्या आफ्रिकन हत्तीला स्वगृही पाठविण्यासाठी प्राणीमित्रांची मोहीम

426
0
आफ्रिकन हत्तीला पुन्हा नैसर्गिक अधिवासात पाठविण्यासाठी प्राणीमित्रांनी सुरू केली मोहीम

एकटेपणा सहसा कोणालाही आवडत नाही. समाज आणि कुटुंबाची प्रत्येक घटकाला गरज असते. यात माणसाप्रमाणे प्राण्यांच्याही काही भावना असतात. भारतात २४ वर्षांपूर्वी आलेल्या शंकर नावाच्या आफ्रिकन हत्तीची अवस्थाही काहीशी अशी झाली आहे. या हत्तीला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठविण्यासाठी भारतात प्राणीमित्रांनी मोठं बंड पुकारले आहे. #FreeShankarDelhiZoo असा हॅशटॅग वापरून समाजमाध्यमांवर मोठी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

 

शंकरला २४ वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या जंगलातून भारतात आणले होते. तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांना झिंम्बॉब्वेकडून भेट म्हणून हत्ती देण्यात आला होता. त्याला दिल्लीमधील एका प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले. मात्र हत्ती या प्राण्याची जगण्याची शैली ही मनुष्यप्राण्याशी मिळतीजुळती आहे. हा प्राणी कळपात राहणे पसंद करतो. त्यामुळे आफ्रिकेतून आणलेला शंकर मागील अनेक वर्षांपासून एकटेपणाचा शिकार झाला आहे. यातून त्याच्यावर शारीरीक तसेच मानसिक परिणामही दिसत आहेत.


शंकरला भारतात आणताना एकटेच न आणता त्याच्यासोबत बोम्बई नावाचा हत्तीही आणण्यात आला होता. दुर्दैवाने त्या हत्तीचा २००५ साली मृत्यू झाला. तेव्हापासून शंकर हा एकटाच भारतात जगतो आहे. मात्र यातून त्याच्यावर होणाऱ्या परिणामांची चिंता करून निकीता धवन यांनी शंकरला आफ्रिकेत पुन्हा पाठविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. युथ फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या त्या संस्थापक आहेत. शंकर अशाप्रकारे एकटे राहणे योग्य नाही. या संस्थेची मागणी आहे की शंकरला दिल्लीतील प्राणी संग्रहालयातून बाहेर काढून आफ्रिकेत पाठवण्यात यावे.

या मोहीमेची माहिती सामान्य लोकांना मिळाल्यापासून जनतेकडूनही शंकरला पुन्हा आफ्रिकेला पाठविण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. इतकेच नाही तर शंकर ज्या प्राणीसंग्रहालयात आहे त्यावरही शंकरसोबत अमानुषपणे व्यवहार होत असल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. आता या मोहीमेला किती प्रतिसाद मिळतो आणि शंकर आपल्या स्वगृही कधी जातो हे पाहणे बाकी आहे.

Previous articleया वर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल इतक्या टक्क्यांची वाढ…
Next articleमहेंद्र सिंग धोनीच्या नव्या ‘योद्धा’ लुकवर प्रेक्षक फिदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here