
भारतीय पोलीस सेवेत रुजु होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यात पूरेपूर उतरण्यासाठी लोक जीवाचे रान करतात. अवघ्या २५ व्या वर्षात या उंच शिखरावर पाऊल ठेवण्याची कामगिरी वैभव निंबाळकर या मराठी सिंघमने केली. सध्या आयपीएस वैभव निंबाळकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. आसामच्या कचार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून आपल्या कर्तव्यावर असताना आसाम-मिझोरम सीमावादाच्या चकमकीत निंबाळकर यांना पायाला गोळी लागून गंभीर जखम झाली आहे. विद्यार्थी ते आयपीएस अधिकारी हा वैभव निंबाळकर यांचा प्रेरणादायी प्रवास आपण नक्की वाचा.
वैभव निंबाळकर यांनी आपल्या साध्या व अबोल स्वभावाने सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे प्राथमिक शिक्षण पुणे येथील इंदापूर या त्यांच्या गावी पूर्ण केले. सर्वसामान्य घरातून आलेल्या निंबाळकर यांनी आपल्या आयपीएस अधिकारी होण्यासाठी चाणक्य मंडळाचा २००४ साली फाऊंडेशन कोर्स केला. २००८ साली पहिल्या प्रयत्नात आयपीएस ही पदवी त्यांनी मिळावली. २००९ साली म्हसुरीला त्यांचा बेसिक फाऊंडेशन कोर्स सुरु झाला. त्यांचे कार्डर आसाम येथे मिळाल्याने एसएचओ या पदावर असताना त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. गुप्तहेर यंत्रणेच्या माध्यमातून हजार किलोचा गांजा त्यांनी पकडून दिला. २६ जुलै रोजी आपल्या कर्तव्यावर कार्यरत असताना आसाम-मिझोरम येथे झालेल्या सीमावादाच्या चकमकीत आयपीएस वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले आहेत.
आपल्या कामगिरीतून महाराष्ट्राचा सिंघम म्हणून ओळख मिळालेल्या वैभव निंबाळकर यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी निंबाळकर यांच्यावर अत्याधुनिक उपचारासाठी मुंबईत आणण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले.त्याप्रमाणे दोन दिवसापूर्वी एअरलिफ्ट करून वैभव निंबाळकर यांना मुंबईत आणण्यात आले आहे. ही माहीती निंबाळकर यांची बहीण अभीनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यमांवर जाहीर केली. बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने संपूर्ण महाराष्ट्राने याची दखल घेतली आहे. वैभव निंबाळकर यांच्या उत्तम आरोग्यासाठी केलेल्या शुभेच्छांसाठी त्यांच्या पत्नी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.