Home ताज्या बातम्या जयंतीः १८५७ च्या उठावातील महानायिका आणि झाशीची वीरांगना झलकारी बाई

जयंतीः १८५७ च्या उठावातील महानायिका आणि झाशीची वीरांगना झलकारी बाई

288
0
zalkari bai
झाशीची वीरांगना झलकारी बाई

भारताचा इतिहास हा मोठा चमत्कारिक आहे. मुळात इतिहास लिहिण्याचा प्रघात भारतात नव्हता. मुघल आणि ब्रिटिश यांच्या आक्रमणानंतर घडलेल्या घटनांची नोंद ठेवली गेली, ज्याला आज आपण इतिहास असे म्हणतो. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या राजवटीत भारतात अनेक ठिकाणी छोटे-मोठे उठाव झाले. १८५७ चा उठाव त्यातील सर्वात मोठे बंड होते. या बंडाचे अनेक नायक आहेत, त्यात एक नायिका आहे. झलकारी बाई. झाशीची राहणारी झलकारी बाई ही झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचा वेश परिधान करुन ब्रिटिशांविरोधात लढली, असे सांगितले जाते.

झलकारी बाई यांची आज (२२ नोव्हेंबर १८३०) जयंती आहे. राणी लक्ष्मीबाई यांचे महाराष्ट्राशी नाते असल्यामुळे आपल्या इथे झाशीची राणी लक्ष्मीबाई प्रसिद्ध आहे. पण उत्तर भारतात आजही झलकारी बाईच्या शौर्याचे किस्से सांगितले जातात. कवी मैथिलीशरण गुप्त यांनी झलकारी बाईंच्या शौर्याचे वर्णन करताना लिहिले आहे…

जा कर रण में ललकारी थी,
वह तो झांसी की झलकारी थी.
गोरों से लड़ना सिखा गई,
है इतिहास में झलक रही,
वह भारत की ही नारी थी

झलकारी लहानपणापासूनच धीट होती. झाशीच्या जवळ असलेल्या भोजला या गावात कोळी समाजात तिचा जन्म झाला होता. सैनिक असलेले वडील सदोवा सिंह यांनी आपल्या मुलीला स्वसंरक्षणाचे धडे दिले. तलवारबाजी, घोडेस्वारी, भालाफेक अशा युद्ध कौशल्यात झलकारी चांगली पारंगत होती. झलकारी बाबात अनेक किस्से सांगितले जातात. त्यात वाघ किंवा चित्त्याचा एक प्रसंग सांगितला जातो. ज्यात तिने एका घावात वाघाला ठार मारले होते.

वयात आल्यानतंर झलकारीबाईचे लग्न झाशीच्या सैन्यात तोफखान्यात काम करणाऱ्या पुरणसिंह याच्याशी झाले. झलकारीच्या शौर्याची चर्चा झाशीच्या राजवाड्यात देखील व्हायची. राणी लक्ष्मीबाई यांना देखील झलकारी बाबत कुतुहल होते. त्यातूनच पुढे झलकारीकडे राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील महिलांच्या तुकडीचे प्रमुखपद देण्यात आले.

१८५७ च्या उठावात झाशी संस्थानाने देखील ब्रिटिशांविरोधात बंड पुकारले होते. मात्र फितुरी आणि पेशव्यांची ऐनवेळी मदत न पोहोचल्यामुळे झाशीला इंग्रजांचा वेढा पडला. या वेढ्यातून आता मुक्तता नाही, याची धारणा राणी लक्ष्मीबाई यांना झाली. त्यावेळी झलकारी यांनी लक्ष्मीबाई यांना धीर देऊन त्यांच्या जागी लढण्याची भूमिका निभावली. वय आणि अंगकाठी मिळतीजुळती असल्यामुळे झलकारी बाई यांना वेशांतर करुन लढणे सोपे झाले. तेवढ्या वेळात राणी लक्ष्मीबाई यांना किल्ल्यातून बाहेर काढण्याचा अवधी मिळाला.

झाशीच्या लढाईचे नेतृत्व ब्रिटिशांकडून जनरल ह्यूग रोझ करत होते. झलकारी बाईंनी अतिशय कमी सैनिकांमध्ये जनरल ह्यूगला कडवी झुंज दिली. या लढाईतच झलकारीला वीरगती प्राप्त झाली. एक दावा असाही केला जातो की, लढता लढता झलकारी ब्रिटिश सैनिकांच्या तावडीत सापडली. आपण राणी लक्ष्मीबाई यांना पकडल्याचा जनरल ह्यूगला आनंद झाला. मात्र जेव्हा सत्यता कळली तेव्हा सर्वच आश्चर्यचकीत झाले. वयाच्या २८ व्या वर्षी झलकारी बाई यांना स्वातंत्र्यासाठी फासावर जावे लागले.

इतिहासाच्या पुस्तकात म्हणावी तशी प्रसिद्धी झलकारी बाईंना मिळाली नाही. मात्र बुंदेलखंड, झाशी इथल्या लोकांनी गाण्यातून झलकारीची शौर्यगाथा जिवंत ठेवली होती. तोच काय तो झलकारीचा इतिहास. भारत सरकारने २२ जुलै २००१ रोजी झलकारी बाईंच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीटही काढले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी झलकारी बाई यांचे पुतळे देखील बसविण्यात आले आहेत. बहुजननायिका म्हणून आता झलकारी बाईंचा जयंतीउत्सव साजरा केला जातो.

Previous articleVideo: पालकांनो तुमच्या पाठीमागे तुमची मुलं जीवघेणे स्टंट करतायत
Next articleओमिक्रॉन की ओमायक्रोन : वाचा, या विषाणूला नाव दिल्याची रंजक कथा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here