Home ताज्या बातम्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला महल्ले दाम्पत्यानी दिली नवी ओळख

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला महल्ले दाम्पत्यानी दिली नवी ओळख

365
0
Mahalle couple gives new identity to Yavatmal district
आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला महल्ले दाम्पत्यानी दिली नवी ओळख

ग्लोबल अवॉर्डसाठी जगातील १७५० कंपन्यांमधून ग्रामहीत कंपनीची निवड

शेतकरी पीक आणि बाजारभाव हे समीकरण कोणालाही नवं नाही. याची योग्य घडी बसली नाही तर शेतकरी आपल्या जीवनाला पूर्णविराम द्यायचा मार्ग स्विकारतो. विदर्भात पांढरं सोन पिकवणारा अग्रेसर जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याचे नाव घेतले जाते. मात्र याच सोन्याला योग्य भाव न मिळाल्याने मागील वर्षाभरात तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. या आत्महत्या रोखून शेतकऱ्याला सुगीचे दिवस आणण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामधील वरूड गावच्या पंकज महल्ले या युवा शेतकऱ्याने ग्रामहीत या आपल्या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्याला लागलेला आत्महत्येचा कलंक पुसण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी आपल्या कर्तुत्वावर कॉर्पोरेट जगातील नोकरीला बाजूला केले. आणि आपल्या पत्नीला सोबत घेऊन शेतकऱ्यांचा आधार बनण्याचा विडा उचलला. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नाची दखल जगानेही घेतली आहे. त्यांनी सुरु केलेल्या “ग्रामहीत” या कंपनीच्या कामाची दखल ‘सिस्को ग्लोबल प्रॉब्लेम सॉल्विंग अवॉर्ड २०२१’ मध्ये घेण्यात आली आहे. यातून आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्याला नवी ओळख मिळवून देण्याचे काम महल्ले दाम्पत्यानी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वरूड या गावचे पंकज महल्ले एक कापूस उत्पादक शेतकरी. घरात कापूस पिकत असतानाही आपल्याला दिवाळीत नवे कपडे घेणंही जमत नाही ही वेदना महल्ले यांच्या मनात लहानपणीच घर करून बसली होती. त्यासाठीच शेतकऱ्याला स्वताचे अस्तित्व तयार करून देण्याचे काम पंकज महल्ले यांनी ग्रामहीत या कंपनीच्या माध्यमातून केले. जगातील १७५० कंपन्यांमधून निवडल्या जाणाऱ्या ४२ कंपन्यांमध्ये ग्रामहीत कंपनीची निवड झाली आहे. आपला महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी या मागच्या प्रमुख उद्देशाची माहीती दिली.

ग्रामहीत कसं साधते शेतकऱ्यांचे हित

शेती उत्पादक म्हटलं, की डोळ्यापुढे येते कृषी उत्पन्न बाजार समिती. यामध्ये शेतमालाचा हमीभाव ठरवला जातो. पारंपारिकरित्या शेतमाल खरेदी-विक्रीची मुभा ही व्यापाऱ्यांनी बळकावली आहे. ग्रामहीत याच दरीला बाजूला करून शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा व हक्काचा थेट मोबदला देण्याचे काम करते आहे. शेतकऱ्याने पिकवलेले पीक हे योग्य भावात व योग्य वेळी विकण्याची संधी शेतकऱ्याला ग्रामहीतच्या माध्यमातून मिळाली आहे. घरबसल्या शेतकरी आपला शेतमाल मोबाईलच्या एका क्लिकवर विकू शकतो. यासाठी शेतकऱ्याला कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे आडते, व्यापारी, हमाल, गाडीभाडे अशा अनेक कुंपणात गुंतून राहण्याची वेळ शेतकऱ्यावर येत नाही.

विदर्भात कडधान्य अथवा कापूस शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. यात वरूणराजाने साथ दिली तर जमिनीतून सोनं काढलं जात. मात्र या सोन्याला योग्य वेळेत योग्य बाजारभाव मिळणे गरजेचे आहे. आपल्या देशात सरकारने शेतकऱ्याला अनेक सोयी सुविधा देऊ केल्या आहेत. मात्र याची पूर्ण माहीती शेतकऱ्याला झालेली नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही शेतकऱ्यांमध्ये सरकारी उपाययोजनांची जनजागृती करायला सुरुवात केली. यातून शेतकऱ्यांना शेतीमध्ये फायदा झाला. मात्र पीक हातात आल्यावर त्याला योग्य भाव मिळणे महत्वाचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागाला असलेल्या आपल्या मुलभुत सुविधा रस्ते,वीज आणि पाणी यामध्ये गोदामाचीही भर व्हायला हवी. यातून गावोगावी शेतकऱ्याला आपले पीक साठवून ते योग्य वेळेला विकता येऊ शकेल. ग्रामहीतने नेमके हेच साद्य करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या याच व्यासपीठाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे, असे त्यांनी आपला महाराष्ट्रला सांगितले.

उच्चशिक्षित पंकजने निवडली शेतीची वाट

पंकज महल्ले यांनी टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई येथून समाजकार्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे टाटा सीएसआर प्रकल्पात जमशेदपूर येथे उच्च पदावर कार्यरत होते. घरातून शेतीची वाट सुरु होत असल्याने शेतकऱ्याच्या मालाला योग्य मोबदला देण्याची ओढ त्यांनी सत्यात उतरवली. त्यासाठी हातात असलेल्या कामाला रामराम ठोकून महल्ले यांनी शेतीचा मार्ग स्विकारला. नोकरी सोडून दोन वर्षांपासून ते पत्नी श्वेतासह ‘ग्रामहित’मार्फत शेतकऱ्यांना सकारात्मक प्रकाश झोतात आणण्याचे काम करत आहेत. त्यांची पत्नी श्वेता या हैदराबाद येथे एका कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर कार्यरत होत्या. महल्ले दाम्पत्यांच्या या वाटचालीमुळे एकेकाळी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याला सकारात्मक ओळख मिळाली आहे.

Previous articleअंकिता आणि रिया सुशांतसाठी झाल्या हळव्या, दोघींनी शेअर केल्या काही खास आठवणी
Next articleडिजिटल इंडियामध्ये श्रीमंत-गरिबामधली दरी गडद होतेय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here