टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाची मान उंचवण्यासाठी भारताचे सर्व खेळाडू जीव तोडून मेहनत करत आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाला जास्तीत जास्त पदक मिळवावीत, अशी भारतीयांच्या अपेक्षा आहेत. काही खेळाडूंच्या पदरी अपयश आले. तर काही अजून जिद्दीने खेळत आहेत. मात्र दुसरीकडे काही खेळाडूंची देशात उपेक्षा होताना पाहायाला मिळत आहे. ऑलिम्पिकमध्ये मजल मारलेल्या भारतीय तिरंदाज प्रवीण जाधव याच्या कुटुंबीयांना जीवेमारण्याची धमकी मिळाली तर भारतीय महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर हरिद्वारमध्ये राहणाऱ्या हॉकी खेळाडू वंदना कटारिया हिच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिव्या देण्यात आल्या. ती दलित असल्याने भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले, असा आरोप तिच्यावर करण्यात आला. या दोन्ही घटना अत्यंत लाजिरवाण्या आहेत. जर खेळाडूंच्या कुटुंबीयांना अशा जाचाला सामोरे जावे लागत असेल तर खेळाडू ऑलिम्पिक असो वा कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यामध्ये पदक कसं मिळवणार ?
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेला तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांना राहत्या घराची दुरूस्ती करून नये, यासाठी जीवे मारण्याची धमकी गाव गुंडांनी दिली. जागतिक स्तरावर देशाचे नाव झळकवणाऱ्या प्रवीण जाधवचा हक्काच्या घरासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही खूप दुदैवी घटना आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी प्रतिनिधीत्व करणारे अनेक खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सर मेरी कॉम असो टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलेफ्टिंगमध्ये रौप्य पदक मिळवून देणारी मीराबाई चानू , बॉक्सिंगमध्ये कास्य पदकाची मानकरी ठरलेली लवलीना या सर्वच खेळाडूंची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. आर्थिक परिस्थितीशी झुंज देत त्यांनी क्रीडा क्षेत्रात यश संपादन केले. परंतु जर खेळाडूंना अशा आर्थिक संकटांचा सामना सातत्याने करावा लागत असेल तर खेळाडू स्पर्धेत यशाचे शिखर कसे गाठणार ? ऑलिम्पिकमध्ये भारताचे स्थान ६२ क्रमांकावर तर आतापर्यंत भारताने केवळ तीन पदके मिळवली आहेत. भारतापेक्षा छोटे असणारे देशही ऑलिम्पिकमध्ये पुढे आहे. खेळाडूंना सर्वच स्तरातून आपल्या येथे पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. पण दुदैवाने ते मिळत नाही. त्यामुळे खेळाडूंना त्याचे लक्ष्य गाठता येत नाही.
सातारा जिल्ह्यातील फलटण तालूक्यातील सरडे या गावात प्रवीण याचे आई-वडिल राहतात. प्रविणचे आजोबा शेतीमहामंडळात कामाला होते. नोकरी गेल्यानंतर त्यांचा संसाराचा कोठेच ठाव ठिकाणा नव्हता. शेती महामंडळाकडून आज ना उद्या रहायला घर मिळेल जमिन मिळेल या आशेवर प्रविणचे वडिल शेती महामंडळाच्या जागेत पाल टाकून रहात होते. पाच बाय सातच्या पालत प्रवीणचा जन्म झाला. सुरुवातीपासून प्रविण खेळात हुशार होता. शिक्षकांनी त्याची खेळाप्रतीची ओढ लक्षात घेऊन त्याला योग्य मार्गर्शन केले. प्रविणला मिळालेल्या मार्गदर्शनावर त्याने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. प्रतिकूल परिस्थितीला समोरे जात प्रवीणने तिरंदाजीत यश संपादन केले आणि देशाचे नाव लौकीक केले. त्याच्या यशाबदद्ल आज संपूर्ण देश कौतुक करत आहे. दुसरीकडे प्रवीणचे पक्क घर गावात होऊ नये यासाठी तेथील गुंड त्यांच्या आई-बाबांना धमकावले. प्रवीण सध्या हरियाणात आगामी होणाऱ्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सराव करत आहे. तो तेथे सराव करत असताना त्याच्या कुटुंबीयांना गावात धमकावले जाते. अशा घटनेने प्रवीणसारखे खेळाडू आपल्या खेळावर लक्ष्य कसे केंद्रीत करतील ? असा प्रश्न निर्माण होतो. ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना पदक मिळवायची असतील तर खेळाडूंची प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी होईल याकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांना सुरुवातीपासून प्रोत्साहन व आर्थिक पाठबळ मिळाले, तर भारत ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत व ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थान प्राप्त करेल.