गुढीपाडवा म्हणजे आनंद ऊर्जा असा हा सण. मात्र नाशिक जिल्ह्यातील भाक्षी गावात एन गुढीपाडव्याच्या पहाटे शोककळा पसरली. या गावचा सुपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचा आज उधमपूर येथे कर्तव्यावर असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती भाक्षीवासियांना होताच गावात पहाटे गुढीपाडव्याचा मुहुर्तावर उभारण्यात आलेल्या सर्व गुढी उतरविण्यात आल्या.
तालुक्यातील सटाणा येथील जवान कुलदीप जाधव यांच्या बलिदानाला काही महिने झाले आहेत. त्यावेळी त्याच्या अखेरच्या प्रवासासाठी स्वप्निलही उपस्थित होता. पाकव्याप्त काश्मीर जवळच असलेल्या उधमपुर येथे कर्तव्यावर असताना आज पहाटेच्या सुमारास दुर्दैवाने शॉर्ट सर्किटमध्ये स्वप्निलने आपला जीव गमावल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. याबाबत जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घेतली जात असल्याचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी सांगितले आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. शहीद वीर जवान शौर्यचक्र विजेता बाजीराव रौंदळ यांच्यानंतर भाक्षीवासियांनी आणखी एक शूर सुपुत्र गमावला आहे. यामुळे गावात उभारलेल्या गुढ्या उतरवल्या गेल्या. संपूर्ण गाव या घटनेचा शोक व्यक्त करत आहे.